वर्धा : या देशाची अखंडता अबाधित ठेवायची असेल तर, देशाच्या विविधतेचा सन्मान करणे गरजेचे आहे. भारताची विविधाच जगात आकर्षणाचा मोठा विषय आहे. अनेक भाषा, धर्म असूनही देश ‘एक’ असण्याचे जगातील एकमेव उदाहरण म्हणजे भारत. त्यामुळे देशाची अखंडता प्रेमाने टिकवावी लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय युवा योजनाचे संचालक आणि गांधीवादी विचारक एस. एन. सुब्बाराव यांनी केले. निवेदिता निलयम युवा केंद्रात आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय युवा संमेलनात युवकांना संबोधित करताना ते बोलत होते. ते म्हणाले, रशियामध्ये १८ भाषा होत्या म्हणून १८ तुकडे झाले. युगोस्लोविया मध्ये ३ भाषा असल्याने तीन तुकडे झालेत. चेकोस्लोवियाचे दोन भाषेमुळे दोन तुकडे झाले. पण भारतात १ हजार ६५२ मातृभाषा आणि १८ संवेधानिक भाषा असूनही भारत एक आहे. आपल्याला ही अखंडता पे्रमाच्या बळावर टिकवून ठेवावी लागेल. बंदुकीच्या किंवा दहशतवादाच्या बळावर आपण देशाची अखंडता टिकवू शकत नाही, असे सुब्बाराव तीन दिवसीय राष्ट्रीय युवा संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात म्हणाले. गीतेची सामाजिक बाजू, कृषी, स्वावलंबी अर्थव्यवस्था आणि विकासनीती, अशा विविध विषयांवर कनार्टकाचे गजानन स्वामी, पवनार आश्रमच्या भावीनी पारेख, डॉ. रामजी सिंह, डॉ. उल्हास जाजू, डॉ. सोहम पंड्या अश्या अनेक वक्त्यांनी आपली मते मांडली. यावेळी युवकांसाठी खुल्या सत्राचे आयोजनही करण्यात आले होते. यामध्ये अनेक युवक सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी)
देशाची अखंडता प्रेमाने टिकवावी लागेल
By admin | Updated: October 6, 2015 02:57 IST