दुष्काळी स्थिती असतानाही पैसेवारी ५० च्या वरराजेश भोजेकर - वर्धाजिल्ह्यातील १३८७ गावे खरीप हंगाम पिकाखाली आहे. पैकी प्रकल्पांतर्गत शहरीकरण किंवा अन्य कारणाने तसेच लागवडयोग्य नसल्यामुळे पेरणी केली न जाणारी ४६ गावे वगळता खरीप पिकास पात्र १३४१ पैकी १०४९ गावांची खरीप पिकांची सुधारीत हंगामी पैसेवारी ५० पैसे व त्यापेक्षा आत आहे, तर उर्वरित २९२ गावांची पैसेवारी मात्र ५० पैशापेक्षा अधिक असल्याचे दर्शविण्यात आले आहे. यामध्ये आष्टी व कारंजा तालुक्यासह आर्वी तालुक्यातील ३६ गावांचा समावेश आहे. परिणामी, या गावातील शेतकऱ्यांची या दुष्काळी स्थितीशी झुंज सुरू असतानाही त्यांच्यावर शासकीय मदतीपासून वंचित राहण्याचे सुल्तानी संकट आहे.यावर्षी खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी पावसाला सुरूवात झाल्यामुळे हा हंगामच अडचणीत आला. जिल्ह्यातील सर्वच भागातील शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले होते. यामध्ये अनेक शेतकऱ्यांना सावकाराचे दार ठोठावावे लागले. पीक कसेबसे वाढले मात्र उत्पन्न नाममात्र आल्यामुळे झालेला खर्चही निघाला नाही. जी पिके शेतात आहे, तीही खर्च भरून काढून शकेल, याची शाश्वती नाही. असे असताना कारंजा आणि आष्टी तालुक्यातील एकाही गावाची पैसेवारी ५० पेक्षा कमी दाखविली नाही़ यावरून शासनाचा हा अहवाल कितपत खरा आहे, यावरच शंका उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासनाने शासनास पाठविलेल्या अहवालानुसार कारंजातील सर्व १२० व आष्टीतील सर्व १३६ गावांसह आर्वीतील ३६ गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त आहे. हा खटाटोप टेबलावरून बसून करण्यात आल्याचे शेतकरी बोलत आहे. शासनाचा कोणताही कर्मचारी पिकाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी शिवारात आला नसल्याचे शेतकरी सांगत आहे. मग हा अहवाल कितपत न्यायसंगत आहे, असा प्रश्न उपलब्ध होतो. खरीप हंगामात आष्टी तालुक्याला लागूनच अमरावती विभाग सुरू होतो. या विभागातील सर्वच तालुक्यांची पैसेवारी ५० च्या आत आहे. मग, पाऊस जिल्ह्याच्या सीमा पाहूनच पडला की काय, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे.
आष्टी व कारंजा तालुक्यांवर अन्याय
By admin | Updated: December 3, 2014 22:54 IST