पुनर्जागरण यात्रा : सर्वेक्षण, मुलाखती, गटचर्चा आणि ग्रामसफाई अभियानवर्धा : तरोडा गावात सर्वेक्षण, मुलाखती, गटचर्चा आणि ग्रामसफाई करून नेहरू युवा केंद्राच्यावतीने शासनाच्या विविध योजना आणि त्यांचे महत्त्व याबाबत पुनर्जागरण यात्रेच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयासमोर नेहरू युवा केंद्राच्यावतीने आयोजित पुनर्जागरण यात्रा कार्यक्रमात पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी तरोड्याच्या सरपंच सुनीता टिकले, उपसरपंच गणेश तिमांडे, ग्रामपंचायत सदस्य उत्तम चांभारे, संदीप लांडगे, नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा व्यवस्थापक ज्योती मोहिते. ग्रामविकास अधिकारी व्ही. एस. इनवाते उपस्थित होते. गावचे मूलभूत प्रश्न आणि उपाययोजना आदीचे निरीक्षण नोंदवून राज्यासह केंद्राच्या विविध जनहितांच्या योजनांचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा. आदर्श अशा गावाची निर्मिती करून देश, राज्याच्या उभारणीत सिंहाचा वाटा उचलावा, असा संदेश पथनाट्याच्या माध्यमातून नेहरू युवा केंद्राच्या युवकांनी ग्रामवासियांना दिला. तरोडा गावात बँक खाते, शौचालयाचा वापर, स्वच्छता, व्यसनमुक्ती आदी प्रश्नांबाबतचे सर्वेक्षण, शाळा, आरोग्य सेविका यांच्या मुलाखती, गटचर्चा, युवा संसद आदी कार्यक्रम नेहरू युवा केंद्राच्या युवकांमार्फत राबविण्यात आले. तरोडा गावातील सर्वेक्षण, गटचर्चा, मुलाखती आदींच्या निरीक्षणांच्या नोंदीनंतर संध्याकाळी पथनाट्याचे सादरीकरण केंद्राच्या युवकांनी केले. यामध्ये पंतप्रधान जनधन योजना, अटल पेंशन योजना, स्वच्छ भारत मिशन, आदर्श ग्राम योजना, कन्या भ्रूणहत्या प्रतिबंध आणि व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन आदी समाजाभिमुख विषयांवर मार्मिक असे सादरीकरण करून तरोडावासीयांना योजनांचे महत्त्व पटवून देण्यात आले.नेहरू युवा केंद्राच्या युवा कलाकरांनी मान्यवरांचे सूतमाला आणि पुस्तक भेट देऊन स्वागत केले. आभार ग्रामविकास अधिकारी व्ही. एस. इनवाते यांनी मानले. कार्यक्रमास गावातील बहुसंख्य ग्रामस्थांची उपस्थिती होती. युवकांनी पहाटे ग्रामस्थांसोबत प्राणायाम केला. तसेच ग्रामसफाई करीत स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.(शहर प्रतिनिधी)
पथनाट्य सादरीकरणातून दिली योजनांची माहिती
By admin | Updated: July 13, 2015 02:13 IST