वर्धा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेतील एकत्रित विद्यार्थी संख्या १५० पेक्षा अधिक असल्यास त्या शाळांना स्वतंत्र मुख्याध्यापक मिळणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने दिली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता पहिली ते पाचवीची पटसंख्या १५० पेक्षा जास्त व इयत्ता सहावी ते आठवीची पटसंख्या १०० पेक्षा अधिक असल्यास स्वतंत्र मुख्याध्यापकाचे निर्धारण होते. परिणामी राज्यात मुख्याध्यापकांची शेकडो पदे अतिरिक्त ठरून त्यांच्या समायोजनाची व पदावनतीची गंभीर समस्या निर्माण झाली होती. यासंबंधाने सोमवारी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांची मुंबर्ई येथे भेट घेत प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. राज्याचे शिक्षण आयुक्त एस. चौक्कलिंगम यांनी शनिवारी प्राथमिक शाळांची एकत्रित विद्यार्थी संख्या १५० पेक्षा अधिक असल्यास स्वतंत्र मुख्याध्यापक इयत्ता सातवीला आठवा वर्ग जोडण्यासाठी विद्यार्थी संख्येची अट शिथील व वरिष्ठ प्राथमिक शाळेसाठी पदवीधर शिक्षक देण्याचे निर्देश दिलेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने या निर्णयानंतर स्वतंत्र मुख्याध्यापक पदासाठीची अट १०० विद्यार्थीसंख्येंतर्गत शिथील करावी, इयत्ता सहावी व सातवीला विषयनिहाय किमान तीन आणि इयत्ता सहावी ते आठवीला चार पदवीधर शिक्षक मान्य करावे. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी प्रत्येक इयत्तेला स्वतंत्र शिक्षक मिळावा अशी मागणी कायम ठेवल्याचे शिक्षक समितीचे विजय कोंबे यांनी कळविले आहे.(प्रतिनिधी)
पटसंख्या १५० असल्यास स्वतंत्र मुख्याध्यापक
By admin | Updated: May 18, 2014 23:49 IST