वाहतूक शाखेचे दुर्लक्ष : प्रमुख मार्गासह, बाजारपेठेतील रस्ते झाले अरूंदवर्धा : शहरातून जाणाऱ्या प्रमुख मार्गालगत तसेच बाजारपेठेतील रस्त्यांवर व्यावसायिकांकडून अवैधरित्या दुकानातील साहित्य ठेवले जात असल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. साहित्यामुळे रस्ते अरुंद झाल्याचे चित्र आहे. याकडे वाहतूक शाखा कानाडोळा करीत आहे. परिणामी, नागरिकांना अनेक अडचणींचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात मागील काही वर्षांपासून वाहनतळाचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरातून जाणारा एक प्रमुख मार्ग असून या मार्गाला इतर लहान मोठे असंख्य रस्ते जोडलेले आहेत. वाहनांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. मात्र, रस्ते आहे तसे आणि तेवढेच आहेत. यातच मागील काही वर्षांपासून रस्त्यांवर अतिक्रमण करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. मुख्य मार्गावर अनेक व्यावसायिकांनी दुकानातील कूलर, कपाट, सोफा तर मिठाई विक्रेत्यांनी गॅसभट्टी, कढाई, हॉटेलचालकांकडून खुर्च्या, टेबल आदी साहित्य ठेवून जागा गिळंकृत करणे सुरू केले आहे. बाजारपेठेत तर व्यावसायिकांच्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाल्याचे प्रकर्षाने जाणवते. अनेक मोठमोठ्या इमारतीचे बाजारपेठेसह अन्य ठिकाणी बांधकाम करण्यात आले; मात्र वाहनतळाचा कुठेच विचार करण्यात आला नाही. बाजारपेठेत चारचाकी वाहन तर सोडा; दुचाकी वाहन ठेवण्यासही जागा असत नाही. वर्षभरापूर्वी अतिक्रमणकर्त्या व्यावसायिकांवर वाहतूक पोलिसांच्या वतीने न्यायालयीन दंडात्मक कारवाई करण्यात आली. यानंतर काही दिवस व्यावसायिकांनी रस्त्यावर साहित्य ठेवणे बंद केले; मात्र वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होताच व्यावसायिकांकडून अर्ध्या रस्त्यापर्यंत दुकानातील साहित्य ठेवले जात असून मुजोरीचा प्रत्यय नागरिकांना येत आहे. रस्त्यावर साहित्य ठेवण्यामुळे रस्ते तर अरुंद झालेच पण बाजारपेठेसह इतर वाहतुकीची नित्याने कोंडी होत असल्याचे चित्र आहे. वाहनतळाचा प्रश्न गंभीर झाला असताना पालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष आहे. वाहनतळाकरिता जागा अधिग्रहित करण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाही. सराफा ओळ, पत्रावळी चौक, गोल बाजार परिसर वाहनांच्या गर्दीने सदैव गजबजलेला दिसतो. या रस्त्यांची वाट काढताना चालकांची अक्षरश: दमछाक होते. विमा कार्यालयासमोरही अवैधरित्या, बेशिस्तपणे नित्याने वाहने उभी दिसतात. मात्र वाहतुकीला वळण लावण्याच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांकडूनही विशेष प्रयतं होताना दिसत नाही. रस्त्यावर साहित्य ठेवण्यासोबतच बाजारपेठेत व प्रमुख मार्गालगतच्या अनेक व्यावसायिकांनी दुकानाचे शेड अतिरिक्त बाहेर काढून अतिक्रमण केल्याचे दिसून येते. वाहतुक सुरक्षित होण्याच्या अनुषंगाने वाहतूक पोलिसांनी अतिक्रमण काढण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.(शहर प्रतिनिधी)
अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीचा होतो खोळंबा
By admin | Updated: June 1, 2016 02:39 IST