वायगाव(नि.) : देशपातळीवर हजार पुरुषांमागे असलेले स्त्री लिंग गुणोत्तराचे प्रमाण व्यस्त आहे. यात सुधारणा करण्याकरिता शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. यासह जनजागृती मोहिमेतून स्त्री भ्रृणहत्या टाळण्याचा संदेश दिला जातो. यातही वर्धा तालुक्यातील ही आकडेवारी आशादायी आहे. २०११ च्या जणगणनेनुसार तालुक्यातील एक हजार पुरुषांमागे ९४४ महिला असे प्रमाण आहे. मुलगा हा वंशाचा दिवा असल्याची गैरसमजूत समाजात रुजल्याने मुलींची गर्भातच हत्या केली जाते. पुरोगामी राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात दररोज गर्भातच कितीतरी कळ्या गर्भातच खुडल्या जातात. प्रभावी जनजागृती होत असतानाही लिंग गुणोत्तर प्रमाणातील असमतोल कायम आहे. या निराशाच्या वातावरणातही वर्धा तालुक्यातील ही आकडेवारी आशादायी आहे. २००१ च्या तुलनेत मुलींची संख्या वाढलेली आहे. वर्धा तालुक्यातील लोकसंख्या पुरुषाची संख्या १ लाख २९ हजार ६८० असून महिलांची संख्या १ लाख २२ हजार २९१ आहे. तसेच वर्धा जिल्ह्यातील २०१२-१३ मध्ये झालेल्या प्रसुतीमध्ये २०११-१२ च्या तुलनेत मुलींच्या संख्यात वाढ झाली असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. नवीन जणगणनेनुसार महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यातीला अन्य तालुक्याच्या तुलनेत वर्धा तालुक्यातील प्रमाण वाढले आहे. स्त्रीभु्रणहत्येबाबत होत असलेल्या जनजागृतीचा प्रभाव यात दिसून येत आहे.(वार्ताहर)
वर्धा तालुक्यातील मुलींच्या संख्येत वाढ
By admin | Updated: September 3, 2014 23:38 IST