वायगाव (नि़) : शहरासह ग्रामीण भागात कौटुंबिक कलह निर्माण होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे़ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अशा प्रकरणांची संख्या दररोज वाढत आहे़ शिवाय पोलिसांपर्यंत न येणारी प्रकरणेही आहेत़ यामुळे शहर व ग्रामीण भागात सामाजिक आरोग्यावर चिंता व्यक्त होत आहे़ या प्रकरणांमुळे पोलिसांसह, महिला आयोगाची जबाबदारी दिवसेंदिवस वाढत आहे़ सध्या समिश्र कुटुंब पद्धती कमी झाली आहे़ मागील काही वर्षांपूर्वी कौटुंबिक कलहातून पोलीस ठाण्यापर्यंत येणारी प्रकरणे क्वचितच पाहावयास मिळत होती़ त्यावेळी अनेक कौटुंबिक वाद घरात वा पुढाऱ्यांच्या मध्यस्थीने मिटविले जात होते; पण गत काही वर्षांत कौटुंबिक वादात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ ही प्रकरणे थेट पोलीस ठाण्यात येऊ लागली आहेत़ दिवसाची सुरूवात पोलीस ठाणे वा चौकीत कौटुंबिक वादाच्या तक्रारीने होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे़ यात पती-पत्नीतील वाद, पती व्यसनाधीन असल्याने गैरसमजातून एकामेकांचे ऐकून कुटुंबातील सदस्यांत उद्भवणारे वाद, सासरच्या मंडळीकडून संशय वा हुंड्यावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ, युवतीतील निराशा, कुटुंबियांशी वाद करून बाहेर पडणाऱ्या युवती आदींमुळे हे वाद निर्माण होत आहे़ सध्या हे वाद चिंताजनक असल्याचे दिसते़(वार्ताहर)
कौटुंबिक वादाच्या संख्येत वाढ चिंताजनक
By admin | Updated: November 16, 2014 23:11 IST