वायगाव (नि.) : निसर्गाच्या प्रकोपामुळे आधीच शेतकरी खचला आहे. गतवर्षी अतिवष्टी, रब्बी हंगामात गारपीट, वादळ आणि आता कोरडा दुष्काळ यात शेतकरी पूर्णत: भरडला जात आहे़ महावितरणनेही शेतकऱ्यांच्या अडवणुकीचेच धोरण राबविले आहे़ रोहित्रातील बिघाड दुरुस्त करण्यासाठी महावितरण शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांना ओलित करणे कठीण झाले आहे़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़ वायगाव (नि.) विद्युत उपके्रदांत येणाऱ्या मौजा रायपुर येथील रोहित्र क्रमांक दोनचे ट्रान्सफार्मर गत दहा दिवसांपासून बंद आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्यात; पण अद्यापही रोहित्र व ट्रान्सफार्मरची दुरूस्ती करण्यात आलेली नाही़ याबाबत तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आधी बिल भरण्याची सक्ती करीत असल्याचा आरोपही केला जात आहे़ यामुळे शेतकरी आणखीच अडचणीत सापडला आहे़ शेतकऱ्यांनी शेतात पेरणी केली आहे. पाऊन न आल्याने कोरड्या दुष्काळाची स्थिती आहे़ यामुळे आधीच शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यात शेतकऱ्यांचा वीज पुरवठा बंद आहे़ शेतकरी दुरूस्तीसाठी तक्रार करण्यास गेल्यास विद्युत वितरण कंपनीकडून अडवणूक करून वसुली केली जात आहे. गत वर्षापासून शेतकरी नुकसान सहन करीत आहे़ यंदाही शेतात कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिकांची पेरणी करून शेतकरी आकाशाकडे टक लावून बसला आहे. विहिरीतून पाणी आणून पिकांना वाचविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत; पण दहा दिवसांपासून रोहित्र बंद आहे़ यात रोहित्रावरील शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर शेतातील पिके पाणी नसल्याने वाळत आहे; पण वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता व अधिकारी बिल भरल्याशिवाय वीज पुरवठा सुरू केला जाणार नाही, असे सांगत आहे़ यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे़ आधीच पिचलेचा शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे. बी-बियाणे, खते वाया जात असताना महावितरण अडवणूक करीत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.(वार्ताहर)
रोहित्राच्या दुरुस्तीसाठी विद्युत कंपनीद्वारे अडवणूक
By admin | Updated: July 3, 2014 23:43 IST