कारंजा (घा.) : जगाचा पोशींदा असलेला शेतकरी, आज उपाशी आहे. इतरांची लाज राखताना आज तोच उघडा झाला आहे. सर्व आघाड्यांवर त्याची पिछेहाट होत असून आत्महत्या करण्यास कसा प्रवृत्त होत आहे. हे हृदयविदारक सत्य काव्यरूपाने प्रा. डॉ. सुनील पखाले यांनी ‘कास्तकारायन’ या वऱ्हाडी काव्यसग्रहांतून प्रभावीपणे मांडले आहे, असे मत मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रमाकांत कोलते यांनी व्यक्त केले.‘कास्तकारायन’ या वऱ्हाडी काव्यसग्रहाचे उद्घाटन येथील चरडे सभागृहात बुधवारी पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रसिध्द गझलकार प्रा. सिध्दार्थ भगत, प्राचार्य डॉ. संजय धनवटे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी आचार्य पदवी प्राप्त करणाऱ्यांचा सत्कार केला. यात प्रा.डॉ. महेंद्र गावंडे, प्रा.डॉ. गायत्री कडवे, कृषक सहकारी संस्था अध्यक्ष म्हणून निवडून आल्याबद्दल प्रा. अविनाश कदम यांचा सत्कार केला. तसेच प्रा. डॉ. सुनील पखाले व प्रा. माया पखाले यांना सन्मानित केले. या कार्यक्रमात स्व. नारायणराव काळे स्मृती मॉडेल कॉलेज येथील विविध मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच विज्ञान अभ्यास मंडळाने आयोजित केलेल्या चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन केले. मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. गणेश मोहोड यांनी केले तर संचालन राणी भांगे हिने केले. कविता संग्रहाचे लेखक प्रा. सुनील पखाले यांनी शेतकऱ्यांची स्थिती ६१ कवितामधून मांडली. वऱ्हाडी भाषेतून प्रकाश टाकला, असा अभिप्राय मान्यवरांनी दिला. मंचावर प्रा. डॉ. गावंडे, डॉ. राठोड, प्रा. अजहर हुसेन उपस्थित होते. आभार प्रा. राठोड यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)
‘कास्तकारायना’तून शेतकऱ्यांच्या दुरवस्थेचे चित्रण
By admin | Updated: September 26, 2015 02:13 IST