महावितरणाचा भोंगळ कारभार : विजेचे खांब उचलले; पण पथदिवे बंदावस्थेतचबोरधरण : दोन वर्षांपूर्वी आलेल्या वादळात हिंगणी येथील विजेचे खांब तुटून तारा रस्त्यावर विखुरल्या होत्या. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर खांब व तारा बाजूला करण्यात आले. खांब तुटल्याने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावरील पथदिवे बंद झाले. दोन वर्षांचा काळ लोटला; पण खांबांची दुरूस्ती झाली नाही आणि पथदिवेही सुरू झाले नाही. यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.हिंगणी येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विजेचे खांब ५ मे २०१३ रोजी झालेल्या वादळी पावसाने तुटले. यामुळे तारा रस्त्यावर पसरल्या होत्या. याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही महावितरणने दुरूस्ती केली नाही. यामुळे तत्कालीन ग्रा.पं. सदस्य प्रवीण तोटे यांनी आंदोलनाचा इशारा दिला. यानंतर ४ जुलै २०१३ रोजी तुटलेल्या तारा व खांब बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला. तुटलेल्या खांबांमुळे सदर मार्गावरील पथदिवे बंद झाले. यामुळे नागरिकांना दोन वर्षांपासून अंधारात ये-जा करावी लागते. अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर गतवर्षी खांब उभे करण्यात आले; पण तारांची जोडणी अद्याप केलीच नाही. यामुळे ग्रामस्थांत असंतोष पसरला आहे. या मार्गाने शेतात ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांसह मजुरांना तसेच अंत्यविधीकरिता जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. धामणगाव येथील नागरिकांनाही हा मार्ग जवळचा आहे. हिंगणी येथे महावितरणचे केंद्र असून वीज सुरळीत करण्यासाठी कर्मचारी आहेत. काही कर्मचारी बाहेर गावाहून ये-जा करीत असल्याने ते दुपारनंतरच दिसतात. गावातील कर्मचारी कामांकडे दुर्लक्ष करतात. दोन वर्षांपासून सायंकाळी या मार्गाने जाताना अनेकांना जखमी व्हावे लागले. मोठा अपघात झाल्यावरच महावितरण तारांची जोडणी करणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)
दोन वर्षांपासून रखडलेल्या कामांकडे दुर्लक्ष
By admin | Updated: December 11, 2015 02:50 IST