अशोकनगरातील घटना : अज्ञाताचा प्राणघातक हल्लावर्धा : येथील अशोकनगर परिसरातील विजय नाडे यांच्या घरावर अज्ञात आरोपींनी सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात मारेकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत विजय यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी जखमी झाली. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली असून सोमवारी पहाटे उघड झाली. जखमी पत्नीवर नागपूर येथे उपचार सुरू आहेत.पोलीस सूत्रानुसार, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास सारे झोपेत असताना अचाक विजय नाडे यांच्या घरून त्यांच्या पत्नीचा आवाज आला. यात ती विजयला मारले, विजयला मारले, असे ओरडत घराबाहेर आली. यावेळी त्यांच्या शेजाऱ्याने घरात जावून पाहिले असता पलंगावर विजय रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्याच्या डोक्यावर व छातीवर जखमा होत्या. शिवाय पलंगावर ठिकठिकाणी रक्ताचे डाग होते. मात्र त्याच्या पत्नीच्या अंगावर कुठलीही जखम नव्हती. या प्रकारात त्यांना जबर मानसिक धक्का बसल्याने त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नागपूर येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे.प्रकरणाची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी करीत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलीस तपास करीत असले तरी त्यांच्या हाती कुठलाही सुगावा लागला नाही. शिवाय त्याच्या पत्नीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्याकडून काहीच माहिती मिळाली नाही. प्राथमिक तपासात विजयची हत्या जुन्या वैमनस्यातून करण्यात आली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
पतीचा मृत्यू; पत्नी जखमी
By admin | Updated: December 8, 2014 22:37 IST