वर्धा : प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान शेतमालाला वाढीव हमीभाव दिले जातील, अशी ग्वाही दिली होती़ असे असले तरी अद्याप वाढीव हमीभाव मिळालेले नाहीत़ यामुळे यंदाच्या हिवाळी अधिवेशनात सर्व शेतकऱ्यांच्या संघटनांच्यावतीने सामूहिकरित्या ही मागणी लावून धरावी, असा ठराव घेण्यात आला़विदर्भातील शेतपिकांचा प्रश्न यावर्षी अधिक जटील व बिकट होत आहे़ नवीन स्थानापन्न झालेल्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उपाययोजना, आंदोलनाची भूमिका व स्वरूप ठरविण्याच्या दृष्टीने किसान अधिकार अभियानने विदर्भातील शेतकरी आंदोलक-कार्यकर्त्यांची बैठक घेतली़ यात दिवसभर चाललेल्या चर्चेनंतर सदर ठराव घेण्यात आला़ सरोज सभागृहात पार पडलेल्या बैठकीला विदर्भातील शेती प्रश्नांवर संघर्षरत निवडक कार्यकर्ते उपस्थित होते़ बैठकीत वर्धा, वणी, यवतमाळ, चंद्रपूर, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर व चंद्रपूर येथील आंदोलक-कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला़ बैठकीला बोलविण्यामागील भूमिका विषद करताना किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांनी विदर्भात सद्यस्थितीत असलेल्या दुष्काळी परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे़ आपण एक-एकट्याने लढत आहोत़ प्रश्नाचे स्वरूप थोडे भिन्न असू शकते; पण प्रश्नाचे मूळ एकच आहे़ अशावेळी आपापल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपण एका आंदोलनाच्या विचारपीठावर आणणे गरजेचे आहे़ यावर्षी आंदोलनात युवा पीढीतील शेतकऱ्यांना जोडण्यासह आता शहरी, उत्साही, अभ्यासू, लढाऊ, युवा पीढीतील युवकांना आंदोलीत करण्याची गरज आहे़ वेळ कमी आहे़ म्हणून आपापल्या क्षमतेने सामूहिक सहमतीच्या मुद्यांवर एकवटलो पाहिजे, असे सांगितले़शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी यंदा दुष्काळ व शासनाच्या वचनभंगाचा प्रश्न आहे़ आंतरराष्ट्रीय बाजारात भाव पडले आहेत़ अशावेळी शासनाने जबाबदारी स्वीकारली पाहिजे़ सरकारला आंदोलनाच्या माध्यमातून जबाबदारीचे भान करून दिले पाहिजे़ शेतकरी नेते चंद्रकांत वानखेडे आंदोलनाची भूमिका विषद करताना म्हणाले आम्ही सरकारचे विरोधी नाही तर आम्ही सरकारचे लहान भाऊ आहोत़ आज आमच्या मदतीला शासनाने आले पाहिजे़ शासनाला जबाबदारी कळावी, यासाठी तीव्र आंदोलनाची गरज आहे़ शेतकरी, कार्यकर्त्यांना निराशा झटकून पुन्हा न्यायाच्या लढ्यासाठी संघटीत झाल्याशिवाय पर्याय नाही़ यावेळी गजानन अमदाबादकर, डॉ़ पुरूषोत्तम दानकर, अॅड़ विनायक काकडे, अॅड़ विप्लव तेलतुंबडे, नारायण जांभुळे प्रा़ विवेक गावंडे, महेश आडे, बाबाराव किटे, नाना देशमुख आदींनी मार्गदर्शन केले़(कार्यालय प्रतिनिधी)
वाढीव हमीभावाची मागणी हिवाळी अधिवेशनात लावून धरा
By admin | Updated: November 17, 2014 23:00 IST