वर्धा : एचआयव्हीसह जीवन जगत असलेल्या लोकांना आधार देण्याकरीता विहान प्रकल्पाअंतर्गत विविध उपक्रम घेण्यात येतात. या उपक्रमाचा भाग म्हणून गांधी मेमोरियल लेप्रसी फाउंडेशन, रामनगर यांच्यावतीने काळजी व आधार केंद्रामार्फत बालकांकरिता संगोपन व सहयोग शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एचआयव्ही सह जगणारी व एचआव्हीसह जगणाऱ्या पालकांची ९८ बालके व १०६ पालकांनी सहभाग नोंदविला.शासकीय व निमशासकीय आरोग्य सेवासह इतर लाभ मिळवुन देत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सहभागी करून घेण्याकरिता कार्य केले जाते.शिबिराचे उद्घाटन गांधी मेमोरियल फांडेशन संचालक डॉ. बी. एस. गर्ग, यांच्या अध्यक्षतेत झाले. यावेळी बाल कल्याण समिती अध्यक्ष संगीता धनाढ्य, अजय भोयर, अजय पालीवाल, डीपीओ शिवा देवगडे, सिंदी (मेघे) सरपंच सुषमा येसनकर विहान प्रकल्प संचालक प्रमोद बहुलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.गांधी मेमोरियल लेप्रसी फॉडेशनच्या डॉ. वारदेकर सभागृहात झालेल्या शिबिरातून एचआयव्ही सह जगणाऱ्या पालकांचे पाल्य व एचआयव्ही पॉझीटिव्ह बालकांना शासनाच्या बाल संगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता जिल्हा महिला व बाल कल्याण विभाग व बाल कल्याण समिती वर्धा जिल्हा यांच्यावतीने माहिती देण्यात आली. यावेळी महात्मा गांधीजींच्या वैष्णव जन तो तेने कहिए हे या भजनाचे सामुहिक गायन करण्यात आले. यानंतर प्रमोद बहुलेकर यांनी आपल्या प्रास्ताविक केले. त्यांनी काळजी व आधार केंद्रामार्फत झालेल्या कार्याचा आढावा सादर केला. एचआयव्हीसह जीवन जगत असलेल्यांना आर्थिक मदतीची गरज विषद केली.कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. संगीता धनाढ्य यांनी बाल कल्याण समिती मार्फत मंजूर करण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.या बाल संगोपन शिबिरात जास्तीत जास्त केसेसची तपासणी करून त्यांना या योजनेशी कशाप्रकारे जोडता येईल याचे मार्गदर्शन केले. यानंतर बोलताना डॉ. गर्ग यांनी एचआयव्ही रुग्णाकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला पाहिजे. केवळ आर्थिक मदत देवून चालणार नाही, त्यांना सामाजिक आधार देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन राजश्री चौधरी यांनी केले तर विहान प्रकल्प समन्वयक वैशाली मैंद यांनी आभार मानले. शिबिरात विमल औझेकर, गायत्री पाटील, विजया खंडाळे, निलीमा तिनघसे, ज्योती जोशी, शहनाज पठाण, तृत्पी थूल, अभिनव थुल, कमलाकर भुंबरे यांनी नियमित मार्गदर्शन केले. बाल कल्याण समिती सदस्यांनी सर्व बालकांच्या कागदपत्रांची तपासणी करुन त्यांची मुलाखत घेतली. बाल संगोपन योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी यादी तयार करण्यात आली. शिबिराला सदस्यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)
बाल संगोपन व सहयोग शिबिरात एचआयव्ही जागृती
By admin | Updated: November 3, 2014 23:31 IST