अतिक्रमणाविरूद्धचा संताप : दुसऱ्या दिवशीही पुलगाव बंद; संतप्त व्यापाऱ्यांची पोलीस ठाण्यावर धावपुलगाव : पाच दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. त्यातच अतिक्रमणग्रस्त महिला रिता थॉमस हिने आत्महत्या केल्याने वातावरण आणखीच तापले़ बुधवारी (दि़४) शवविच्छेदनानंतर रिताचा मृतदेह पालिकेच्या आवारात ठेवत बसपाद्वारे आंदोलन करण्यात आले़ अखेर दुपारी ३ वाजतानंतर प्रशासन व आंदोलनकर्ते यांच्यात मृतकाच्या मुलास नोकरी व आर्थिक मदत, असा सामंजस्यपूर्ण समेट घडून आल्याने वातावरण काहीसे निवळले. सतत सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहीम आणि दोन दिवसांपासून सामाजिक दबावामुळे ठप्प झालेले बाजारपेठेतील व्यवहार यामुळे शेकडो आंदोलनकर्ते आणि व्यापाऱ्यांनी बुधवारी ११ वाजता मोर्चा काढत पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त केला. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती पाहता बुधवारीही बाजारपेठा बंद होत्या. परिस्थिती लक्षात घेत पोलीस प्रशासनाने पुन्हा अतिरिक्त पोलीस कुमक बोलाविली. जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर हे देखील दाखल झाले होते. प्रशासन व आंदोलनकर्ते यांच्यात बराच काळ चर्चा झाल्यानंतर मृतकाच्या मुलास नगर पालिकेच्या आस्थापनेत घेण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे पाठविण्याचा, त्यांनी मान्यता दिल्यानंतर नोकरी देण्याचा व मृतक महिलेच्या कुटूंबीयास २५ हजार देण्याचा निर्णय उभय पक्षात घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष मनीष साहू यांनी ‘लोकमत’ला दिली. समेट झाल्यानंतर रिता थॉमस हिचे पार्थिव नातेवाईकांनी ताब्यात घेवून अंत्यसंस्कारासाठी नेले. आंदोलनात बसपा जिल्हाध्यक्ष उमेश म्हैसकर, कुंदन जांभुळकर, राजु लोहकरे, हेमलता शंभरकर यांनी तर शोकसभेत चंद्रकात वाघमारे, गौतम गजभिये, अरूण रामटेके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. चर्चेत उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजन पाली, नगराध्यक्ष मनीष साहू, बसपाचे उमेश म्हैसकर, कुंदन जांभुळकर, राजू लोहकरे, कॉँग्रेस शहराध्यक्ष रमेश सावरकर, सुभाष लुकड, मौला शरीफ ही मंडळी सहभागी झाली होती.(तालुका प्रतिनिधी)
मदत व नोकरीने आंदोलक शांत
By admin | Updated: February 4, 2015 23:18 IST