लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हिंगणघाट तालुक्यातील कुंभी शिवारातील यशोदा सिड्स कंपनीच्या प्लॅन्टवर धडक देत कृषी विभागाच्या भरारी पथकाने विविध कागदपत्रांची तपासणी केली. या तपासणीदरम्यान यशोदाच्या कपाशी बियाण्यांचा उगमस्थान कळेल यासाठी महत्त्वाचे असलेले स्टेटमेंट १ व २ तसेच प्रिन्सिपल सर्टिफिकेट नसल्याचे पुढे आल्याने यशोदाच्या कपाशी बियाण्यांच्या विक्रीवर थेट बंदीच घालण्यात आली आहे. हा आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी निर्गमित केला असून कृषी विभागाच्या या कारवाईमुळे कृषी व्यवसाय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. कृषी विभागाकडून ‘सेल स्टॉप’ लावण्यात आल्याने यशोदा कंपनीचे हे कपाशी बियाणे कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे अवघ्या काही दिवसांपूर्वी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्धा शहरातील काही कृषी केंद्रांची तपासणी करून दोन कृषी केंद्रांचा बियाणे विक्रीचा परवानाच निलंबित केला होता. तर आता हिंगणघाट तालुक्यात धडक कारवाई करण्यात आली. अधिकारी आता कुठला तालुका निवडतात याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
हिंगणघाट तालुक्यातील पाच कृषी केंद्रातील कपाशी बियाणे विक्रीवरही लावली बंदी- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांच्या नेतृत्वातील कृषी विभागाच्या भरारी पथकाने शनिवारी हिंगणघाट तालुक्यातील काही कृषी केंद्रांचीही धडक तपासणी केली. या तपासणी मोहिमेदरम्यान पाच कृषी केंद्रात विक्रीसाठी असलेल्या कपाशी बियाण्यांबाबतचे प्रिन्सिपल सर्टिफिकेटच नसल्याचे पुढे आल्याने या कपाशी बियाण्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी निर्गमित केला आहे. विक्री बंदी लावण्यात आलेले हे कपाशी बियाणे कोटीच्या घरात असल्याचे सांगण्यात आले.
शनिवारी हिंगणघाट येथील पाच कृषी केंद्र तसेच हिंगणघाट तालुक्यातील कुंभी परिसरातील यशोदा सिड्स कंपनीच्या प्लॅन्टची तपासणी करण्यात आली. प्रिन्सिपल सर्टिफिकेट व स्टेटमेंट १ तसेच २ नसल्याने कपाशीच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.