तळेगाव (श्यामजीपंत) : मुलीला शाळेतील इतर विद्यार्थी दररोज मारहाण करतात. यामुळे मुलगी शाळेत जाणार नाही असे पालकाला म्हणाली. यावरून पालक शिक्षकांना या संदर्भात विचारणा करण्याकरिता शाळेत गेले असता त्यांच्याशी चर्चा करण्यापेक्षा मुख्याध्यापकाने त्या पालकाला हाकलून लावल्याचा प्रकार रामदरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत घडला. या बाबतची तक्रार पालक पुरूषोत्तम दयाराम बन्नगरे यांनी गटशिक्षणाधिकारी आष्टी यांना दिली आहे. पुरूषोत्तम बन्नगरे यांची मुलगी रामदरा जि.प.शाळेत इयत्ता चवथीत शिकत आहे. तिला शाळेतील काही विद्यार्थी दररोज मारहाण करीत असल्याची तक्रार तिने पालकाकडे केली. शिवाय मी शाळेत जाणार नाही असेही तिने म्हटले. यावर बन्नगरे यांनी शाळेमध्ये जावून विद्यार्थ्यांना शिक्षकामार्फत समजाविण्याकरिता मुख्याध्यापक कांदे यांना विनंती केली. यावर कांदे यांनी त्यांचे काही एक न ऐकता येथे काहीच बोलू नको असे म्हणत सदर पालकास शाळेतून हाकलून दिले. यापुढे शाळेत यायचे नाही. बडबड करून नकोस असे म्हणून माझे न ऐकता मला हाकलून लावल्याचे बन्नगरे यांनी गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सदर मुख्याध्यापकाचे घर हे शाळेच्या शेजारी असल्याने मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे न देता घरातून शाळा व शाळेतून घर अशा चकरा मारत असल्याचाही उल्लेख तक्रारीत आहे.(वार्ताहर)
पालकाला मुख्याध्यापकाने शाळेतून हाकलले
By admin | Updated: November 30, 2014 23:12 IST