शेतकर्यांचे बँक खातेच नाही : रक्कम कृषी विभागाकडे पडून कारंजा (घाडगे) : तालुक्यात मार्च-फेब्रुवारी २0१४ मध्ये गारपीट व वादळी पावसामुळे नुकसान झाले. शेतकर्यांच्या आर्थिक मदतीसाठी आलेल्या रक्कमेपैकी बरीच रक्कम वितरित झाली; मात्र काही शेतकर्यांनी त्यांचा बँक खाते क्रमांक दिला नसल्याने १६ लाख रुपयांचा निधी परत जाण्याची भीती तालुका कृषी अधिकार्यांनी वर्तविली आहे. कारंजा तालुक्यातील अनेक गावात फेब्रुवारी व मार्च २0१४ ला अचानक जोरदार गारपीट व वादळी पाऊस झाला. शेतातील गहू, हरभरा व संत्रा आणि इतर फळबागांचे, लाखो रुपयांचे नुकसान झाले. कृषीविभाग, ग्रामसेवक आणि तलाठी यांनी संयुक्त सर्वेक्षण करून क्षतीग्रस्त झालेल्या ५ हजार, शेतकर्यांची यादी नुकसान भरपाई अनुदानाकरिता शासनाकडे पाठविली शासनाने या पाहणी अहवालाच्या आधारावर, २ कोटी ७0 लाख रुपये मदत निधी म्हणून तालुका कृषी अधिकारी कार्यालयात पाठविला. तालुका कृषी अधिकार्यांनी २५ मे पर्यंत २ कोटी ५४ लाख रुपये बँक ऑफ इंडीया शाखा कारंजा येथे शेतकर्यांच्या खात्यात जमा केल्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक अधिकार्यांकडे सादर केला. ज्यांना या अनुदानाचा लाभ मिळाला नसेल त्यांनी त्वरीत कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा आपल्या खात्याचा क्रमांक कळवावा, म्हणजे पैशाचा वाटप करता येईल, अन्यथा १६ लाख रुपये परत जातील अशी माहिती तालुका कृषी अधिकार्यांनी दिली. यामुळे परिसरातील शेतकर्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकार्यांना द्यावी असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.(तालुका प्रतिनिधी)
गारपीटग्रस्तांचे १६ लाख परत जाण्याची भीती
By admin | Updated: June 4, 2014 00:13 IST