रसुलाबाद : सततच्या नापिकीने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक बाजू सुधारावी म्हणून अतिवृष्टीने खचलेल्या व बुजलेल्या विहिरीच्या दुरूस्तीकरिता शासनाकडून अनुदान देण्यात येत आहे. याकरिता दीड लाख रुपयाची तरतुद करण्यात आली आहे. मात्र रसुलाबाद येथील शेतकरी या अनुदानापासून वंचित आहे. पावसाळा तोंडावर आला तरीही अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे विहिरीची दुरुस्ती झालेली नाही. या अनुदानाकरिता जिल्हानिहाय शेत सर्व्हे करण्यात आला. संबंधीत विभागाकडे याच्या याद्या तयार करुन मंजुरीस पाठविल्या. हे अनुदान १० ते १०० टक्केपर्यंत मिळते. येथील पात्र लाभार्थ्यात अंबादास बिजवे, एकनाथ सावरकर, देवीदास गवारते, नारायण गवराते, नंदू सावरकर, सुभाष पादोडे, प्रभाकर सावरकर, माधव बमनोटे, मुस्तफा खॉ पठाण, विजय चौधरी, विजय चौकुडे, अरूण कनेरी, विठ्ठल लोहकरे, देवराव रघाटाटे, वामन भलमे, सुभाष गुल्हाने, माया ढोके, अशोक अलोणे, चंद्रकांत पाटील, बंडू लोखंडे, भास्कर बांदरे, राजेंद्र राऊत यांचा समावेश आहे. विहिरी दुरूस्तीकरिता अनुदान मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी याची विचारणा संबंधित विभाकडे केली. तरीही समस्या कायम असल्याने शेतकरी हतबल झाले आहे.पेरणीचा हंगाम आला तरीही विहीर दुरूस्तीचे कामाचे पत्रक शेतकऱ्यांना मिळालेले नाही. निधीचा हप्ता प्राप्त झाला नाही. यातील पात्र शेतकरी आर्वी येथील कार्यालयात विचारण करण्यासाठी गेले. मात्र याचा काहीच उपयोग झाला नाही. त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी याचा पाठपुरावा केला. मात्र त्यांना टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात आली. या प्रकाराने लाभार्थी शेतकरी अडचणीत आले आहे.(वार्ताहर)
नादुरूस्त विहिरीचे अनुदान रखडले; शेतकरी हतबल
By admin | Updated: May 28, 2016 02:13 IST