सेलू : तालुक्यातील अनेक गावात मनरेगा अंतर्गत राबविण्यात आलेल्या वृक्ष लागवड व संवर्धनाच्या कामात बोगस मजुरांच्या नावावर मजुरीच्या पैशात भ्रष्टाचार होत असल्याचे वृत्त सोमवारच्या ‘लोकमत’च्या अंकात प्रकाशित होताच भ्रष्ट ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहे. कोणत्या ग्रामपंचायतीत किती बोगस मजुरांच्या नावे पैशाची उलच झाली याची गटविकास अधिकारी चौकशी करणार आहे. त्यामुळे ते ग्रामसेवक कोण याचा लवकरच पंचनामा होणार आहे. यामुळे ग्रामसेवकांकरवी त्या बोगस मजुरांशी संपर्क साधला जात असून कामावर होतो, असे त्याच्याकडून खोटे बोल वदवून घेण्यासाठी धडपड सुरू आहे. वृक्ष लागवड व संवर्धनासाठी ग्रामपंचायती अंतर्गत जे मजूर कामावर होते त्यांना मजुरी दिली जात आहेच. पण यासोबतच एकही दिवस काम न केलेल्या मजुरांच्या नावे त्यांच्याशी सलगी ठेवून बोगस मजुरी दाखवून बोगस मजुरांच्याच स्वाक्षरीने विड्राल करण्यात आल्याच्या घटना काही ग्रामपंचायतीमध्ये घडल्या आहे. या संदर्भात गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी यांना ‘लोकमत’ने हा प्रकार लक्षात आणून दिल्यावर त्यांनी चौकशीअंती अशा ग्रामसेवकांना निलंबित करण्याची कारवाई केल्या जाईल, अशी ताठर भूमिका घेतली आहे. त्यामुळे ग्रामसेवकांची पाचावर धारण बसली आहे. असे ग्रामसेवक बोगस मजुरांशी संपर्क करून त्यांना मी कामावर होता असे खोटे बोलण्यास बाध्य करण्याची धडपड करीत आहे. परंतु गावातील भोळ्या भाबड्या लोकांना हा बोगस मजूर एकही दिवस कामावर नव्हता हे सत्य सांगण्यासाठी कुणाचीही भीती वाटणार नाही हे मात्र भ्रष्ट ग्रामसेवक विसरत चालले आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मुजोर झाल्याचे ग्रामस्थ वारंवार सांगत असतात. पंचायत समिती स्तरावरील विस्तार अधिकाऱ्यांशी मधूर संबंध ठेवायचे व मुख्यालयी न राहता ग्रामसेवक अधिकाऱ्यांना चिरीमिरी देवून आपल्या हिताचे रेकॉर्ड अपडेट करून ठेवले जात असल्याचे सर्वत्र चित्र आहे. वृक्षलागवड योजनेतील किती वृक्ष लावले व किती जगले हे प्रत्यक्ष पाहण्याची गरज आहे. डॉ. मोकाशी यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने भ्रष्ट ग्रामसेवकांचे धाबे दणानले आहे.(तालुका प्रतिनिधी)
ग्रामसेवक घेत आहे ‘त्या’ बोगस मजुरांचा शोध
By admin | Updated: November 3, 2014 23:31 IST