प्रफुल्ल लुंगे - सेलूप्लास्टिक पन्नीचा दुकानदार व ग्राहकांनी वापर करू नये, बाजारात जाताना कापडी पिशवी सोबत न्यावी, यासाठी सेलू ग्रामपंचायतीने मोठ्या कापडी पिशव्या तयार करून घेतल्या व त्यावर प्लास्टिक पन्नीच्या वापराबद्दलचे दुष्परिणामाच्या सूचना छापल्या आहेत. प्रत्येक घरी जावून संक्रांतीच्या पर्वावर हळदीकंूकू, तिळगुळ व एक कापडी पिशवी भेट देवून महिलांना ग्रामपंचायतीच्या महिला सदस्य ‘वाण’ देणार आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच असा उपक्रम होत असून यामुळे प्लास्टिक बंदीवर निश्चितच आळा बसण्यास मदत होणार आहे. सरपंच डॉ. राजेश जयस्वाल यांनी प्लास्टिक बंदीबाबत गावात सूचना पत्रके, दवंडी व कार्यक्रमातून पन्नी वापरण्याचे दुष्परिणाम नागरिकांच्या लक्षात आणून दिले. तरीही पन्नीचा वापर सुरू आहे. यामुळे लोकांना सवय लावण्यासाठी गृहिणींच्या हाती थेट कापडी विनामुल्य कापडाची पिशवी देवून तिचा बाजारासाठी निरंतर वापर करण्याची जबाबदारी देण्याची कल्पना सरपंचाच्या मनात येताच त्यांनी ती प्रत्यक्षात साकारली. पाच हजार कापडी पिशव्या व त्यावर संदेश छापून घेतले जवळपास १४ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात ४ हजार घरात संक्रांतीच्या पर्वावर या पिशव्या गृहिणींना वाण म्हणून दिल्या जाणार आहे. या उपक्रमामुळे एकाच प्रकारच्या पिशव्या बाजारात प्रत्येकाच्या हाती दिसेल व पर्यावरणाला हातभर लावण्यासाठी प्लास्टिक मुक्तीची आपोआपच लोकांना सवय लागेल, असा विश्वास सरपंचाना आहे. महिला सदस्य, सामाजिक कार्यात रूची असणाऱ्या महिला दररोज घरोघरी जावून तिळगुळासोबत हे अनोखे वाण पाच दिवस वाटणार आहे.
प्लास्टिक मुक्तीसाठी ग्रा.पं. सरसावली
By admin | Updated: January 15, 2015 22:58 IST