वर्धा : सिंदी (मेघे) येथील वॉर्ड क्र. पाच पाण्याची टाकी परिसराला मागील अनेक वर्षांपासून समस्यांनी विळखा घातला आहे. साचलेल्या पाण्यात रस्तेही गडप झाल्याने रहदारीची समस्या निर्माण झाली आहे. पाणी वाहून जाण्याकरिता नाल्या नसल्याने चक्क नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे. शिवाय डासांचीही मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत असल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत ग्रा.पं. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कायम दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.सिंदी मेघे परिसर शहराला लागूनच आहे. असे असताना अनेक मुलभूत सुविधांचा अभाव आहे. अनेक वर्षांचा काळ लोटूनही नाल्यांचा पत्ता नाही. नाल्या नसल्याने खुल्या जागेत पावसाचे पाणी साचते. परिणामी, रहदारीही ठप्प होते. या पाण्यात सापांचा वावर असल्याने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासन व वरिष्ठांकडे पाठपुरावा करूनही कानाडोळा केला जात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे रूपेश भोयर यांनी केला आहे.शिवाय घरापुढेच पाणी साचत असल्याने पावसाळ्यात प्रचंड त्रास सहन करावा लागतो. वॉर्ड सदस्याचे आजवर दर्शन झाले नाही, निवडणुकीनंतर ते बेपत्ता झाले, असेही नागरिक सांगतात. या भागात काही दिवसांपूर्वी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले; पण क्षमतेपेक्षा अधिक जड वाहतूक होत असल्याने रस्त्याची दुरवस्था होत आहे. पाणी वाहून जाण्याकरिता टाकलेले पाईपही बुजविले आहे. यामुळे पाणी साचत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने असंतोष पसरला आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
साचलेल्या पाण्यात रस्ते गडप
By admin | Updated: June 19, 2015 00:23 IST