वर्धा: महाराष्ट्र शासन, आरोग्य सेवा असे लिहून असलेल्या चारचाकी वाहनाने जिल्ह्यात अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सेलडोह जवळ नाकाबंदी केली. मात्र या वाहनाला अपघात झाल्याने यातील एक जण गंभीर जखमी झाला तर चालक वाहन सोडून पसार झाला. हा अपघात महालक्ष्मी पेट्रोलपंप, खडकी येथे सोमवारी रात्री १० वाजता झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक चारचाकी वाहन क्रमांक एमएच ३२ बी ०८६५ हे मध्यप्रदेश येथून कान्होलीबारा, सेलडोह मार्गे वर्धेकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याकरिता सेलडोह येथे नाकाबंदी करिता जात असताना खडकीजवळ एक वाहन अपघातग्रस्त स्थितीत दिसले. पोलिसांनी वाहनाची पाहणी केली असता सदर वाहन हे दारूची वाहतूक करणारे असल्याचे निष्पन्न झाले. तसेच वाहनात जखमी स्थितीत असलेला विशाल लक्ष्मण शंभरकर (२६) रा. वॉर्ड नं. ६ पवनार याला चालकाबाबत विचारले असता अविनाश वैद्य रा. आर्वी नाका, वर्धा असे असल्याचे सांगितले. यात दारूच्या बाटली, एक मोबाइल, वाहन असा ४ लाख ७९ हजार ६५० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील आरोपी अविनाश वैद्य याने त्याच्या ताब्यातील वाहनात अवैध दारू भरून भरधाव व निष्काळजीपणे रस्त्यावरील कंटेनरला धडक दिली. तसेच जखमीला मदत करण्याकरिता उपाययोजना न करता घटनास्थळावरून फरार झाला. तसेच शासकीय चिन्ह असलेले वाहन अवैधरित्या दारूची वाहतूक करण्याकरिता वापरले, यावरून गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक पराग पोटे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.(प्रतिनिधी)
दारुच्या तस्करीत शासकीय वाहन
By admin | Updated: October 5, 2016 01:46 IST