वर्धा : आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे तसेच सर्व शैक्षणिक सुविधा एकत्र उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील भाड्याच्या इमारतीत असलेल्या वसतीगृह व शाळाच्या शासकीय इमारती येत्या पाच वर्षात बांधण्यात येतील, अशी ग्वाही आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव यांनी रविवारी वर्धेत दिली. आदिवासी समाजातील मुला व मुलींच्या तीन वसतीगृहाच्या इमारतीचे भूमिपूजन आदिवासी विकास राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. वर्धा शहरातील शासकीय आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उमरी (मेघे) येथे ७ कोटी ५० लक्ष रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या या इमारतीत ३७५ विद्यार्थ्यांची सुविधा होणार आहे. ही इमारत सप्टेंबर १६ पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे तयार करण्यात येणार आहे. यावेळी आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त एम.पी. कल्याणकर, जिल्हाधिकारी संजय भागवत, प्रकल्पाधिकारी हरिराम मडावी, सार्वजनिक बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता राजीव गायकवाड, माजी अपर जिल्हा पोलीस अधीक्षक टी.एस. गेडाम, नामदेव मसराम, अमित कोवे, अॅड. मतिराम मडावी आदींची यावेळी उपस्थिती होती. आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासोबतच उच्च शिक्षणासाठी वसतीगृहाच्या शासकीय इमारती नसल्यामुळे भाड्याच्या इमारतीमध्ये सुविधा पुरविण्यात येत असल्याचे सांगताना ना. राजे अम्ब्रीशराव म्हणाले की, शिक्षणाच्या सुविधा निर्माण करीत असताना दर्जा वाढविण्यावरील विशेष भर देण्यात येणार आहे. आदिवासीचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असून या योजनांचा लाभ आदिवासी जनतेनी घ्यावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. प्रारंभी ना. राजे अम्ब्रीशराव यांनी उमरी येथील साडेचार एकर जागेवर बांधण्यात येत असलेल्या वसतीगृहाच्या इमारती व येथील सुविधाबद्दल माहिती घेतली. तसेच यावेळी बसविण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव गायकवाड, उपविभागीय अभियंता गजानन टाके तसेच सराफ व नंदलाल घडीया यांनी त्यांचे स्वागत केले. (प्रतिनिधी)
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी येत्या पाच वर्षात शासकीय इमारती
By admin | Updated: May 11, 2015 01:37 IST