अधिकारी व दलालांच्या संगनमताने विविधात प्रमाणपत्रांचा खुलेआम बाजाररूपेश खैरी, प्रशांत हेलोंडे वर्धाबोला... काय पाहिजे... जात प्रमाणपत्र, जातपळताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखल, अधिवास प्रमाणपत्र... पटकन सांगा... आवश्यक कागदपत्र आणा.. तुमचे वडील हजर नसतील तर त्यांचे छायाचित्र आणा.... प्रमाणपत्र केव्हा पाहिजे ते सांगा.. असे म्हणत विविधा केंद्रात दलालांनी शैक्षणिक सत्राकरिता आवश्यक कागदपत्राचा व्यवसायच सुरू केला आहे. प्रमाणपत्र एका दिवसात पाहिजे असल्यास एक ते दीड हजार व चार-पाच दिवसांचा कालावधी असेल तर पाचशे ते सातशे रुपये. हे चित्र गुरुवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमुळे समोर आले आहे. या प्रकाराची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना झाल्याने त्यांनी येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावले. मात्र या कॅमेऱ्यासमक्षच दलालांची समांतर यंत्रणा बिनदिक्कतपणे सक्रिय असून हे अधिकाऱ्यांसोबतच्या अर्थकारणाशिवाय शक्य नसल्याचेही पुढे आले आहे. वडील हजर नसल्यास त्यांचे छायाचित्रही चालेल विविधा केंद्रात प्रमाणपत्राकरिता आलेला विद्यार्थी दलालांच्या संपर्कात आला तर त्याच्याकरिता विविध सेवा सुविधा सुरू होत असल्याचे येथे निदर्शनास आले. जात प्रमाणपत्र काढण्याकरिता आवश्यक असलेल्या कागदपत्रांसह आॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. याकरिता मुलासह त्याचे वडील हजर असणे गरजेचे आहे; मात्र दलालांशी झालेल्या व्यवहारात वडील हजर नसले तरी काम अडणार नाही, अशी मुभा आहे. या विद्यार्थ्यांकडे त्याच्या वडिलांचे छायाचित्र असले तरी चालेल. त्या छायाचित्रावरून नोंदणी करण्याची सोय त्यांच्याकडून करण्यात येत आहे. या कामात येथील कर्मचाऱ्यांचे सहकार्य असल्याशिवाय हे शक्य नसल्याचे दिसते. विद्यार्थ्यांना बसत असलेला भुर्दंड कमी करण्याकरिता असलेल्या या केंद्रात दलालांच्या हस्तक्षेपामुळे भुर्दंडात वाढच होत असल्याचे दिसते. जिल्हाधिकाऱ्यांचे कॅमेरे कुचकामी येथील विविधा केंद्रात सुरू असलेल्या दलालांच्या या अनागोंदीची माहिती बाहेर येण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी येथे सीसीटीव्ही येथे कॅमेरे लावले; मात्र ते कॅमेरेही येथे कुचकामी ठरत आहे. या कॅमेऱ्यासमक्षच हे दलाल बसून विद्यार्थ्यांना नागवित आहेत. त्यांना असलेल्या घाईचा लाभ या दलालांकडून घेण्यात येत आहे. अर्ज भरण्यापासून ते प्रमाणपत्रापर्यंतचा करारविद्यार्थ्यांना हेरून दलाल अर्ज भरून देण्यापासून त्यांना प्रमाणपत्र देण्यापर्यंतचे पूर्ण करार करीत असतात. यात कमी दरात सौदा झालेल्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन नोंदीकरिता रांगेत उभे राहून छायाचित्र काढावे लागते. तर मनमर्जीतील रकमेत सौदा झाल्यास त्या विद्यार्थ्यांना थेट कॅमेऱ्यासमोर नेण्याची व्यवस्था होते. ही आॅनलाइन नोंदणी झाल्यावर उर्वरीत कामाकरिता विद्यार्थी उपस्थित नसले तरी चालेल. त्यांच्याकडून घेतलेले कागद वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत नेण्यापासून त्यांची स्वाक्षरी आणण्यापर्यंत सर्वच कामे त्यांच्यामार्फत करण्यात येते. ही सर्व कामे करण्याकरिता त्यांना लागणाऱ्या कालावधीनंतर संबंधित विद्यार्थ्यांला बोलावून प्रमाणपत्र त्याच्या स्वाधीन करण्यात येते. विविधा केंद्रात दलालांची गर्दी वाढत आहे. याची कल्पना आहे. त्यांच्यावर आळा बसविण्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. त्यातून काऊंटरवर सतत येणारे चेहरे शोधण्याचा प्रयत्न आहे. जे चेहरे नियमित दिसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय या भागात कारवाई करण्यासंदर्भात पोलिसांना सूचना करण्यात आल्या आहेत. असे असले तरी विद्यार्थ्यांनी व पालकांनी दलालांकडे जाणे टाळण्याची गरज आहे. तरी या प्रकारावर आळा घालण्याकरिता काही ठोस कारवाईचे प्रयोजन करण्यात येईल. -आशुतोष सलील, जिल्हाधिकारी, वर्धा
हजार रुपये द्या, प्रमाणपत्र घ्या!
By admin | Updated: June 26, 2015 02:00 IST