वर्धा : झोपडपट्टीवासीयांना स्थायी पट्टे देण्यात यावे, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ.) च्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष विजय आगलावे यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन सादर केले. झोपडपट्टीवासीयांना स्थायी पट्टे देण्याच्या मागणीकरिता आतापर्यंत अनेक मोर्चे, धरणे व जेलभरो आंदोलन रिपाइंतर्फे करण्यात आले आहे. परसोडी (सिंदी रेल्वे), रोहणखेडा, कानगाव, गाडेगाव, ता. हिंगणघाट, वडार झोपडपट्टी (चितोडा), रोडा ता. वर्धा येथील झोपडपट्टीवासियांना न्याय देण्यात यावा तसेच झुडपी जमिनीचे शेत मजुरांना, कष्टकऱ्यांना वाटप करण्यात यावे, गवंडी बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये मानधान देण्यात यावे, अन्न सुरक्षा योजनेपासून शेतमजूर वंचित आहेत त्यांना त्वरीत लाभ देण्यात यावा आदी मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यांची पूर्तता करण्याची मागणी यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशानुसार शासकीय जमिनीवर सन २००० पर्यंत अतिक्रमण करून झोपडी बांधून राहत असलेल्यांना स्थायी पट्टे देण्यात यावे असा आदेश पारीत करण्यात आला आहे. असे असतानाही शासनांतर्गत आदेशाचे उल्लंघन होत आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागात गरजु व गरीब नागरिकांनी शासकीय जागेवर झोपडी बांधून कुटुंबांनी जीवन जगणे सुरू केलेले आहे. त्यांच्या झोपड्यांचे वास्तव अतिक्रमण हे सन २००० पूर्वीचे आहे. यातील बहुतेक नागरिक हे बी.पी.एल. कार्डधारक व भटक्या आदिवासी जमातीतील आहेत. त्यांना राज्य शासनाच्या घरकुल योजनेतून घर मंजूर झाले. परंतु त्यांच्याजवळ स्थायी पट्टे नसल्यामुळे ते या योजनेपासून वंचित आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात शासनातर्फे भूसंपादन करून गरजुंना प्लॉट वाटप केले. त्यापैकी बरेच प्लॉट हे वाटप न झाल्यामुळे खऱ्या लाभार्थींनाही त्या प्लॉटवर स्वत:ची घरे बांधता आलेली नाहीत. या सर्व गंभीर बाबींचा शासनाने विचार करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. धरणे आंदोलनात रिपाइंचे प्रकाश पाटील, अजय मेहरा, अॅड. राजेश थुल, विजय चन्ने, राजु खडतकर, देविदास भगत, महेंद्र मुनेंश्वर, सतीश इंगळे, रामचंद्र थुल, सुरेंद्र उगले, दिनेश तागसांडे, ऋषी ढोके, देवानंद कांबळे, मोहन वनकर, राजु वासेकर, सुभाष कांबळे, सुरेंद्र पुनवटकर, विजय नगराळे, सुखदेवे, तेलतुमडे, संजय वर्मा, प्रियदर्शना भेले, सुनंदा निशाने, जया मोटघरे, वंदना देशपांडे, शिला थुल, मुन्ना शेख, गवई, प्रशांत रामटेके आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)
झोपडपट्टीवासीयांना स्थायी पट्टे द्या!
By admin | Updated: December 8, 2015 02:52 IST