जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पालकमंत्र्यांना निवेदनातून साकडेवर्धा : जिल्ह्यात दारूबंदी असताना मोठ्या प्रमाणात गावठी दारू गाळली जाते. गवठी तसेच देशी-विदेशी दारूची ठिकठिकाणी विक्रीही होते. गावठी दारू गाळणारे समाजातील दुर्लक्षीत घटक असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सदर दारूगाळणाऱ्या हातांना सन्मानजनक काम द्यावे, तसेच जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभुमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्यात दारू विक्रीवर बंदी असताना मोठ्याप्रमाणात दारू तयार करणे तसेच विक्रीचा व्यवसाय चालतो. दारूच्या व्यसनामुळे अनेक घरे उद्धवस्त झाली आहेत. सेवाग्राम येथील महात्मा गांधी यांचे आश्रम जगप्रसिद्ध आहे. परंतु, याच परिसरात दारू निर्मिती व विक्रीचा व्यवसाय आपले मुळ घट्ट करू पाहत आहे. त्याचप्रमाणे पवनार परिसरातही गावठी दारू गाळण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. दारूविक्रीच्या व्यवसायामुळे परिसरातील शांतता भंग होत आहे. दारूविक्रीच्या व्यवसायाचा सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागतो. त्यामुळे नागरिकांची समस्या लक्षात घेता सेवाग्राम, पवनारसह जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच गावठी दारू गाळणाऱ्यांचे मन परिवर्तन करून त्यांच्या हातांना सन्मानाचे काम द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.सदर मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी स्विकारले असून ते जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पालकमंत्री मुनगंटीवार यांना पाठविण्यात आले आहे. निवेदन देताना रिपाई(ग.)चे जिल्हाध्यक्ष गोकुल पांडे, नरेंद्र पाटील, हिरालाल नगराळे, अविनाश ढाले, उमेश पाटील, सचिन फुटाने व रिपाई(ग.)चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी कराजिल्ह्यात दारू विक्रीवर बंदी असताना सेवाग्राम व पवनार परिसरात दारूचा महापूर वाहतो. ही निंदनीय बाब आहे. सेवाग्राम व पवनारसह जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दारूगाळणाऱ्या हातांना सन्मानजनक काम द्या
By admin | Updated: April 30, 2017 01:09 IST