तहसीलदारांना निवेदन : समुद्रपूर व हिंगणघाट येथील शेतकऱ्यांची मागणीहिंगणघाट : खरीप हंगामात पावसाच्या लंपडावामुळे हिंगणघाट- समुद्रपूर परिसरातील शेतकऱ्यांना कपाशीच्या पिकांची दुबार-तिबार पेरणीला समोर जावे लागले. यामुळे बी-बीयाणे व रासायनिक खतासाठी शेतकऱ्यांना अतोनात खर्च करावा लागला. तसेच रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे एकरी २५ हजार रुपयाची मदत शेतकऱ्यांना देण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांना केली.सोयाबीनचे संपूर्ण पीक यंदाच्या बेभरवशी पावसाने वाया गेले. शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी केलेला खर्चही निघू शकला नाही. यामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. काही शोतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक न सवंगता सरळ शेतात गुरे सोडुन दिली. पीकांच्या या स्थितीमुळे शेतकऱ्यांची दिवाळीही अंधारमय गेली. कापसाची लागवडही दोन-तिनदा करण्यात आली. त्यालाही पुरेसे पाणी मिळाले नाही. अपुऱ्या पावसामुळे कपाशी पिकाच्या जमिनीमध्ये भेगा पडलेल्या आहे. पठारी भागातील कपाशीचे पीक तर सुकलेल्या अवस्थेत आहे. अशातच पडलेली थंडी व धुके यामुळे कपाशीवर मोठ्या प्रमाणात लाल्या रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. अगोदरच विदर्भातील शेतकऱ्यांचे नापिकीमुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे लाल्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत म्हणून एकरी २५ हजार रूपये देण्याची मागणी रुपेश लाजुरकर यांच्या सहकार्याने समुद्रपूर व हिंगणघाट परिसरातील शेतकऱ्यांनी येथील तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली. तसेच मागण्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांनाही पाठविण्यात आले.(तालुका प्रतिनिधी)
एकरी २५ हजारांची मदत द्या
By admin | Updated: November 30, 2014 23:11 IST