वीज दरवाढीचा ‘शॉक’ पिंपळखुटा : वीज कंपनीद्वारे ग्राहकांना दरवाढीचा शॉक देण्यात येत आहे. सध्या वहन वीज आकाराच्या नावावर अधिकाधिक भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागत आहे. महावितरणद्वारे विजेची गळती, चोरी कमी होत नसल्याने ती दरवाढीच्या माध्यमातून ग्राहकांकडून वसूल करण्याचा फंडा कंपनीने शोधला आहे. महावितरणने जून २०१५ मध्ये दरवाढीचे सुत्र निर्धारीत केले. इंधन समायोजन आकारामुळे वीज दरात दीडपट वाढ केली. यामुळे घरगुती, व्यापारी व शेतकऱ्यांचे बिल वाढले. आता महावितरणद्वारे डिसेंबर २०१६ मध्ये पुन्हा सरासरी १९ टक्के व चौथ्या वर्षात दरवाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. यामुळे ही वीज दरवाढ इतर राज्यांच्या तुलनेत २५ ते ४० टक्के जादा आहे. उद्योगाद्वारे मंजूर प्रस्तावानुसार महावितरणने नोव्हेंबर २०१६ पासून दुसऱ्यांदा वीज दरवाढ केली. आता वहन आकाराच्या नावाने ही दरवाढ केली आहे. याचा सर्वाधिक फटका घरघुती ग्राहकांना बसणार आहे. शेतीच्या वीज बिलातही वाढ केली आहे. यापूर्वी शेती वीज पंपासाठी २०१५ मध्ये ३ एचपीला ५५ पैसे प्रती युनीट दर होते. यावर २०१६ मध्ये ४८ पैसे तर नोव्हेंबर २०१६ पासून ३६ पैसे युनिट दरवाढ केली. १०० युनिटच्या वर वीज वापर झाल्यास अधिक दर आकारले जातात. यामुळे ही वीज दर वाढ रद्द करावी, अशी मागणी ग्राहक करीत आहेत.(वार्ताहर)