मुकेश माकेजानी : जनजागृती कार्यक्रमांतर्गत विविध योजनांची माहितीवर्धा : स्कील इंडिया योजनेच्या माध्यमातून बारावीनंतर शिक्षण सोडलेल्या युवकांनी कौशल्य प्रशिक्षण घेवून आपला व्यवसाय सुरू करा. या प्रशिक्षणाच्या जोरावर बेरोजगारीवर मात करा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक मुकेश माकेजानी यांनी केले.भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रसिद्धी संचालनालय, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा प्रशासन व जिल्हा अग्रणी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धा तालुक्यातील तिगाव येथे आयोजित केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या जनजागरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वच्छ भारत मिशनचे समन्वयक महेश डोईजर, जिल्हा अग्रणी बँकेचे अशोक गवई, वायफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साबळे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी संजय तिवारी, सरपंच शीतल मसराम, उपसरपंच साधू रपाते आदी उपस्थित होते.माकेजानी म्हणाले, युवकांच्या कौशल्य विकासासाठी नव्याने उद्योग व कौशल्य विकास मंत्रालयाची निर्मिती केली आहे. या माध्यमातून नॅशनल स्कील मिशन आणि नॅशनल स्कील डेव्हलपमेंट पॉलिसी तयार करण्यात आली आहे. या अंतर्गत शैक्षणिक पात्रतेच्या आधारे युवकांचा विकास केला जाणार असल्याचेही माकेजानी यांनी सांगितले. प्रारंभी क्षेत्रीय प्रचार अधिकारी सतीश घोडके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. केंद्र शासनाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयामार्फत राज्यामध्ये विविध ठिकाणी केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या जनजागृतीसाठी कार्यक्रम घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. साबळे यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ विषयी मार्गदर्शन केले. मुलींच्या फक्त जन्माचेच स्वागत न करता ती पुढे चांगली शिकली पाहिजे असे ते म्हणाले. स्वच्छ भारत मिशनचे समन्वयक महेश डोईजर यांनी स्वच्छता व वैयक्तिक शौचालयाचे महत्व सांगून गावात ज्या कुटुंबाचे बेस लाईन सर्व्हेमध्ये नाव आहे, अशा कुटुंबांना त्यांनी शौचालय बांधल्यानंतर अनुदान मिळेल असे सांगितले. या निमित्ताने तिगाव गावामध्ये ग्रामस्थ, युवक महिला व मुलांची प्रचार फेरी काढण्यात आली. प्रचार फेरीमध्ये सुमारे १५० जणांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छ भारत यावर घोषणा दिल्या. संत गाडगेबाबा सांस्कृतिक कला मंचने यावेळी पथनाट्यातून स्वच्छ भारत, बेटी बचाओ बेटी पढाओ यावर जनजागृती केली.ग्रामस्थांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात येऊन विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सुरेश दुधे यांनी केले. क्षेत्रीय प्रचार अधिकारी संजय तिवारी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचा लाभ गावातील सुमारे ४०० ग्रामस्थांनी घेतला. यावेळी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या प्रभारी अधिकारी सुनिता लोखंडे, मनोज राऊत, अंगणवाडी कार्यकर्त्या, आरोग्य सेवक, ग्रामसेवक व्ही.एन. फुलझेले, जि.प. उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक आदींना यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.(शहर प्रतिनिधी)
‘स्कील इंडिया’तून रोजगारक्षम व्हा!
By admin | Updated: November 21, 2015 02:35 IST