रोहणा : धनगर जातीचा समावेश अनुसूचित जमातीत व्हावा अशी मागणी होत असल्याच्या धर्तीवर गवळी समाजाचाही अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा, अशी मागणी महाराष्ट्र गवळी समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात समाजबांधवांच्या वतीने करण्यात आली. यावेळी जातीव्यवस्थेच्या शासकीय वर्गवारीवर सखोल चर्चा करण्यात आली. नोमॅडीक ट्राईबमध्ये पेस्ट्रोहर व नॉन पेस्ट्रोहर असे दोन भाग पडतात. पेस्ट्रोहर नोमेड मध्ये गवळी व त्यांच्या २५ पोटजाती, धनगर व त्यांच्या २४ पोटजाती येतात. या दोन्ही जाती व त्यांच्या पोटजाती नैसर्गिक संसाधनावर अवलंबून राहाव्या लागतात. मानववंशशास्त्रज्ञांच्या मते गवळी व धनगर समाज एकाच संवर्गात येतात. पंडीत हिरालाल व रसेल यांनी लिहिलेल्या कास्ट अँड ट्राईब इन इंडिया या पुस्तकात या दोन्ही जाती एकाच संवर्गात येत असल्याचे नमूद केले आहे. भटक्या जमातीच्या यादीत प्रवर्ग क मध्येच धनगर व गवळी या जातींचा समावेश असणे आवश्यक असल्याचे राज्य मागास वर्गीय आयोगाचेही मत आहे. म्हणून गवळी समाजानेही ही मागणी लावून धरणे तर्कसंगत असल्याचे सांगितले . राज्यातील सर्व भटक्या विमुक्त संघर्ष वाहिनीच्या वतीने तिसऱ्या सुचीची मागणी केली जात आहे. रेणके आयोगाने शिफारस करूनही केंद्र शासनाने तिसरी सूची घोषित न केल्यामुळे त्यातील धनगर, बंजारा, कोळी व भोई या जातीतील लोक अनुसूचित जमातीची मागणी करीत आहे. गवळी समाज तर यआ सर्वांपेक्षा मागासलेला आहे. त्यामुळे गवळी समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा यासाठी संघटित होवून संघर्ष करणे आवश्यक असल्याचे मत समाजातील मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी खासदार हंसराज अहीर, किसन हूंडीवाले, हिरामन गवळी(धुळे), बाबासाहेब गलाट वर्धा, गोपाल कालोकर, संदीप टाले, भंडारा, सदाशिव खडके अमरावती, वैशाली अवथळे, प्राचार्य शांताराम आसोले, कारंजा, वसंत डोळे रोहणा यांच्यासह अनेकांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला समाजबांधवांची उपस्थिती होती.(वार्ताहर)
गवळी समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश व्हावा
By admin | Updated: September 5, 2014 00:01 IST