हिंगणघाट : येथील नेताजी वॉर्डातील संत गाडगेबाबा पुतळ्याजवळील उजवणे यांच्या घरी डोम्या (इंडियन ब्लॅक कोब्रा) साप आढळला. सर्पमित्र विक्की कोटेवार यांनी पकडून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे मदतीने कोल्हीच्या जंगलात सोडून देण्यात आले.सदर साप सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास आशिष कृष्णराव उजवणे यांना घराच्या अंगणात दिसून आला. हा महाकाय साडेपाच फुट लांब साप पाहून कुटुंबीयांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी लगेच सर्पमित्र विक्की कोटेवार याला बोलविले. विक्कीने सदर साप पकडून वनविभागाचे राऊंड आफीसर आर.डी. गिरी, वनमजूर कोळसे, कल्याणी गोंडणे यांच्या मदतीने कोल्हीच्या जंगलात सोडून दिले. या सापाच्या मानेवर १०७ रेषा असून पहिल्या वर्षी ५ रेषा व नंतर दरवर्षी एक रेष येत असल्याने या सापाचे वय १० वर्षांचे असल्याचे कोटेवार यांचे मत आहे. सापाचे विष काढून विकणे म्हणजे निसर्गाशी बेईमानी आहे. १४ वर्षांच्या काळात साप पकडताना तीन वेळा सर्पदंश होऊनही जिवंत असल्याचे मतही कोटेवार यांनी व्यक्त केले.(तालुका प्रतिनिधी)
सापाला दिले जीवदान
By admin | Updated: October 28, 2016 01:40 IST