लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : नालीतील गढूळ व दूषित पाणी विहिरीत झिरपले. ते नागरिकांनी प्राशन केल्याने तारासावंगा गावात गॅस्ट्रोची लागण झाली आहे. आतापर्यंत ७० रुग्णांना भरती करण्यात आले असून आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेने आरोग्य विभागात खळबळ माजली आहे. साहुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत राऊत पथकासह पहाटे ५ वाजता गावात दाखल झाले. हगवण व उलट्यांमुळे रुग्ण त्रस्त झाले आहेत. तारासावंगा गावाला सार्वजनिक विहिरीवरून पाणीपुरवठा होतो. या पाण्याच्या प्रवाहात नालीचे पाणी शिरले. विहिरीतील पाणी शुद्ध होत नसल्याने ते पाणी नागरिकांनी पिण्यासाठी वापरले. दरम्यान, सोमवारी सायंकाळपासून काहींना मळमळ सुरू झाली. रात्रभरात हगवण, उलट्यांची लागण झाल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. माहिती मिळताच डॉक्टर हजर झाले. दूषित पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेला पाठविण्यात आले. पाणी उबडून पाणी साठवण्याचे भांडे, टाके कोरडे करण्यास सांगण्यात आले. पर्यायी व्यवस्था म्हणून दुसरीकडून पाणी घेण्याचे आवाहन करण्यात आले. ग्रा.पं. च्या आवारात रुग्णांची तपासणी करून सलाईन लावण्यात आली. सरपंच रत्नपाल पाटील, ग्रामसेवक चंद्रशेखर चोपडे यांनी पाणी पुरवठ्याची पाहणी व विहिरीत ब्लिचींग पावडर टाकण्याचे काम सुरू केले आहे. वॉर्ड क्र. २ मध्ये रुग्णसंख्या अधिक असल्याने तेथे घरोघरी भेट देत डॉ. राऊत यांनी उपाय सुचविले. गावालगत नदी असून त्यातील पाणी पिल्यानेही काहींना गॅस्ट्रोची लागण झाली. गावातील लहान मुले, महिला, पुरुष आजारी झाल्याने सर्व कामे ठप्प आहेत. यामुळे गावात वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीपर्यंत रुग्णांना बरे करण्याचे प्रयत्न आरोग्य विभाग करीत आहे. ७० रुग्णांच्या रक्ताचे नमूने घेण्यात आले असून ३० जणांना सलाईन लावण्यात आली. शिवाय पाण्यात टाकून पिण्याचे पावडर, इंजेक्शन देण्यात आले आहे. तारासावंगा गावात गॅस्ट्रोची लागण झाली आहे. आतापर्यंत ७० रुग्णांची नोंद करून तपासणी केली आहे. दूषित पाणी पिण्यात आल्याने हा प्रकार घडला आहे. - डॉ. भागवत राऊत, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, साहुर.
तारासावंगात गॅस्ट्रोची लागण; ७० रुग्ण दाखल
By admin | Updated: May 17, 2017 00:29 IST