शैलेश नवाल : सहा पालिकांची निवडणूक वर्धा : जिल्ह्यातील ६ नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी जाहीर केला. २७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २८ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीकरिता १७ आॅक्टोबरपासून संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत लागू राहणार आहे. यामुळे सर्वांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. राजकीय पक्षांना निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. २२ डिसेबर २०१६ रोजी मुदत संपणाऱ्या वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी, सिंदी, पुलगाव अशा सहा पालिकांसाठी २७ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. यासाठी २४ आॅक्टोबरपासून सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्र देण्यास सुरुवात होणार आहे. २९ आॅक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशन पत्र भरून सादर करण्याची अंतिम मुदत २९ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ पर्यंत आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी व ते मागे घेणे २ नोव्हेंबर २०१६ रोजी सकाळी ११ वाजता सुरु होईल. त्याच दिवशी वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यन्त उमेदवारी मागे घेता येईल. उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप १२ नोव्हेंबर रोजी करण्यात येऊन त्याच दिवशी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.निवडणुकीमध्ये सर्व पक्षांनी आचारसंहितेचे पालन करावे, नागरिकांना कुठल्याही प्रकारचे प्रलोभन देण्यात येणार नाही याची काळजी घ्यावी. सभेसाठी परवानगी घेतल्याशिवाय सभा घेऊ नये. तसेच पक्षाच्या उमेदवारांच्या वाहनालाही परवानगी घ्यावी लागेल. राजकीय पक्षांनी निवडणूक आचारसहिंतेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बैठकीत केले.(प्रतिनिधी)
आचार संहितेचे पालन करा
By admin | Updated: October 19, 2016 01:22 IST