बसपाचे आंदोलन: लॉएड्स वसाहतीमधील कर्मचाऱ्याचा मृत्यू वर्धा : भूगाव येथील उत्तम व्हॅल्यू कंपनीच्या वसाहतीच्या आवारात असलेल्या मंदिराच्या परिसरात येथील कंत्राटी वीजतंत्रीचा मृतदेह आढळला. त्याचा मृत्यू येथे विजेच्या धक्क्याने झाल्याचा आरोप बसपाच्या कार्यकर्त्यांनी केला. मृतकाच्या परिवाराला कंपनीकडून मदत मिळावी याकरिता शवविच्छेदनानंतर कामगाराचा मृतदेह कंपनीच्या मुख्य गेटजवळ ठेवत रविवारी बसपाने आंदोलन केले. यावेळी कंपनी व पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थतीने झालेल्या चर्चेत मृतकाच्या परिसवाराला कामगारांच्या फंडातून आर्थिक मदत देण्याच्या आश्वासनावर प्रकरण निवळले. संजय देवराव वाघमारे (४८) रा. सेलूकाटे असे मृतकाचे नाव असल्याचे सांगण्यात आले.पोलीस सुत्रानुसार, भुगाव येथील लॉएड्स स्टीलच्या वसाहतीच्या आवारातील मंदिराजवळ शनिवारी रात्रीच्या सुमारास संजय वाघमारे यांचा मृतदेह आढळून आला. यावेळी कंपनीच्या मदतीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. रविवारी सकाळी त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर मृतकाच्या कुटुंबियांनी व बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सदर मृतदेह कंपनीच्या मुख्य फाटकावर ठेवत त्याच्या परिवारातील सदस्यांना मदत मिळावी याकरिता आंदोलन पुकारले. कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सदर आंदोलन सुमारे पाच तास सुरू होते. यावेळी झालेल्या चर्चेअंती निघालेल्या मार्गावर सहमती दर्शवित आंदोलन मागे घेण्यात आले. या संदर्भात कंपनीशी संपर्क साधला असता संजयचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याचा शवविच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त झाला नसून अहवालानंतर काय ते सत्य समोर येईल. या आंदोलनात बसपाचे जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार, मंडळ प्रभारी अॅड. सुनील डोंगरे, अॅड. हर्षवर्धन गोडघाटे, भास्कर राऊत, भैसारे, मनीष फुसाटे, प्रमोद सवई, उत्तम कांबळे, किशोर चौधरी, मंदाताई पाटील यांच्यासह सेलू काटे येथील गावकऱ्यांचा समावेश होता.(प्रतिनिधी)कामगार फंडातून मदत ासपाचे शिष्टमंडळ, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे व कंपनीच्या अधिकाऱ्यात झालेल्या चर्चेत मृतकाच्या कुटुंबियांना कामगार फंडातून दोन लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला. यातील ५० हजार रुपये सोमवारी तर उर्वरीत रक्कम येत्या १० तारखेला देण्याचे यावेळी ठरले.
आर्थिक मदतीवर प्रकरण निवळले
By admin | Updated: October 19, 2015 02:16 IST