देवळी : स्थानिक पोलिसांनी ४८ तासांत चोरीचा छडा लावत पाच महिलांना अटक केली. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. मालती लोंढे, चंद्रकला पात्रे, भारती नाडे, सोनी सकट व पात्रे सर्व रा. वर्धा अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. तालुक्यातील कोटेश्वर देवस्थान येथे ३१ आॅगस्ट रोजी यवतमाळ जिल्ह्यातील मौदा येथे राहणाऱ्या दीपा ढोकणे (४८) त्यांच्या बहिणीकडील कार्यक्रमासाठी आल्या होत्या. मंदिरात गाभाऱ्यामध्ये दर्शन करीत असताना महिलांनी दीपा ढोकणे यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. देवळी पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवर तपास सुरू केला. यात पोलिसांनी सेलूच्या विकास चौक परिसरात वाहनांची तपासणी केली असता एका वाहनात या महिला त्यांच्या नातलगासह आढळल्या. त्यांना अटक केल्यानंतर मंगळसूत्रही जप्त करण्यात आले. ही कारवाई ठाणेदार साखरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक हरले, राजू बावणे, विलास गमे, अनूप खेळकर, गणेश लुटे रत्नाकर कोकाटे, लिना सुरजूसे, बाबू उईके यांनी केली.(प्रतिनिधी)
चोरीतील पाच महिलांना अटक
By admin | Updated: September 3, 2015 01:45 IST