टाकरखेड : नांदपूर विभागातील काही शेतकऱ्यांना कृषिपंपाकरिता वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. येथील काही शेतकऱ्यांनी जोडणीकरिता अनामत रक्कम भरली; पण वीज कंपनीच्या वेळकाढू धोरणामुळे गत दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळालेली नाही. यामुळे विहिरीला पाणी असतानाही सिंचन करणे शक्य होत नाही.शेतकरी आर्थिकदृट्या सक्षम व्हावा, यासाठी तत्कालीन शासनाने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पॅकेजअंतर्गत धडक सिंचन विहीर योजना अंमलात आणली होती. या योजनेंतर्गत नांदपूर परिसरातील टाकरखेड, शिरपूर, लाडेगाव, परतोडा येथेल शेतकऱ्यांनी विहिरी खोदल्या आहे. यानंतर वीज जोडणीकरिता अर्ज दिले. वीज वितरण कंपनीने अर्ज स्वीकारले मात्र पुढील कार्यवाही केली नाही. शेतकऱ्यांनी वीज जोडणीकरिता लागणारी डिमांड रक्कम भरली. यानंतर त्यांना दोन वर्षांपासऊन प्रतीक्षा करावी लागत आहे. कृषि संजीवनी या योजनेतून मान्य झालेल्या या विहिरी केवळ शेताची शोभा वाढवीत असल्याचे दिसत आहे. सिंचन करण्यासाठी वीज जोडणीची गरज आहे. याकरिता विहिरी खोदल्यानंतर शेतकऱ्यांनी २०१२ मध्ये डिमांड रक्कमेचा कंपनीकडे भरणा केला. पण विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेळकाढूपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता डिमांड भरणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने वीज जोडणी द्यावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणाकडे वरिष्ठांनी लख्ष देत कार्यवाहीचे आदेश देण्याची मागणी आहे.(वार्ताहर)
कृषी पंप वीजजोडणीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
By admin | Updated: November 24, 2014 23:03 IST