जिल्हाधिकारी : कृषी केंद्रांत पॉस मशीन लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या रासायनिक खतावरील अनुदान थेट लाभ हस्तांतरण अंतर्गत संबधित उत्पादक, पुरवठादार कंपनीला देण्यात येते; पण पुरवठादार कंपन्या बोगस शेतकरी दाखवून अनुदान लाटत होत्या. यामुळे १ जूनपासून शेतकऱ्यांनी रासायनिक खते खरेदी करताना आधारकार्ड सोबत ठेवणे गरजेचे आहे. याद्वारे खताची आवश्यक तेवढीच सबसिडी पुरवठादार, उत्पादक कंपन्यांना मिळेल. शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना रोखरहित व्यवहार करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. थेट हस्तांतरण प्रकल्प जिल्ह्यात १ जूनपासून राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ‘पॉस’ मशीन हे ‘एम- एफएमएस’मध्ये नोंदणी केलेल्या किरकोळ पुरवठादारांना पुरविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांकरिता कृषी निविष्ठा केंद्रांवर पॉस मशीन तसेच आधार कार्ड आधारित मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी आधार कार्ड, डेबिट कार्डचा वापर करून बियाणे, खते आणि किटकनाशकांची खरेदी करावी. शिवाय सर्व शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड नजीकच्या आधार कार्ड केंद्रामध्ये जाऊन अद्यावत करून घ्यावेत, निविष्ठा खरेदीसाठी आधार कार्ड वरील बोंटाचे ठसे, अद्यावत असणे गरजेचे आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कृषी निविष्ठा खरेदीत शेतकऱ्यांनी कॅशलेस पद्धतीचा वापर करावा
By admin | Updated: May 18, 2017 00:38 IST