वैद्यकीय अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीने तणाव समुद्रपूर : जनावरांना चारापाणी करण्याकरिता जात असलेल्या शेतकऱ्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात सायकलस्वार शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास चंद्रपूर मार्गावर जाम नजीक घडली. मारोती विठोबा चंदनखेडे (५०) रा. जाम असे मृतकाचे नाव आहे. मारोती चंदनखेडेचा मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. मात्र वैद्यकीय अधिकारी नसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त करीत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षाला कुलूप ठोकले. नागरिकांचा वाढता रोष पाहता हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयातून वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रेमचंद वरभे यांनी येत मृतदेहाचे शवविच्छेदन केले. पोलीस सुत्रानुसार, मारोती चंदनखेडे यांची चंद्रपूर मार्गावर शेती आहे. तेथेच त्यांची बैलजोडी व इतर जनावरे आहेत. नित्याप्रमाणे तो कामावर जात असताना शैलेश पटेल यांच्या घराजवळ त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात मारोतीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी)
अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकरी ठार
By admin | Updated: May 23, 2016 02:05 IST