आकोली : शासनाच्या योजनेत उचललेल्या साहित्याचे देयक कृषी विभागाने वेळीच सादर न केल्याने कंपनीने सर्व साहित्य परत नेले. हा आघात सहन न झाल्याने मदनी येथील शेतकऱ्याला हृदयविकाराचा झटका आला. त्याच्यावर नागपूर येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करावी लागली. मदन वंजारी, असे शेतकऱ्याचे नाव आहे. मदन वंजारी यांनी शासनाच्या ‘कोरडवाहू शाश्वत शेती’ या योजनेंतर्गत अनुदानावर ट्रॅक्टर आणि शेतीपयोगी साहित्याची उचल केली. या साहित्याच्या खरेदीचे देयक ८५ हजार रुपयांचे झाले होते. साहित्य खरेदीचे देयक संबंधित कंपनीला कृषी विभागाच्यावतीने देण्यात आले नाही. यामुळे सदर कंपनीने शेतकऱ्याच्या घरून खरेदी केलेले साहित्य उचलून नेले. या प्रकारामुळे शेतकऱ्याला जबर मानसिक धक्का बसला. यातच मदन वंजारी यांना हृदयविकाराचा झटका झाला. त्यांना उपचारार्थ नागपूर येथे नेऊन त्यांच्यावर शस्त्रक्रीया करावी लागली. यात शेतकऱ्याला अकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.(वार्ताहर)
कृषी विभागाच्या अनागोंदीमुळे शेतकऱ्याला हृदय विकाराचा झटका
By admin | Updated: July 10, 2015 00:31 IST