आष्टी (श.) : केंद्र व राज्य शासनाने शेतीला जोडधंद्या म्हणून शेकडो योजनांवर अनुदान वाटप सुरू केले़ या योजनांतर्गत प्रकल्प मंजूर झाल्यावर मात्र अनुदान काढून देण्यास टाळटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करीत येथील एका शेतकर्याने विभागीय कृषी सहसंचालक नागपूर यांच्याकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीत संबंधीत अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे़ मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे़ प्राप्त महितीनुसार, येथील अल्पभूधारक प्रगतीशील शेतकरी अण्णाजी राणे यांच्याकडे चार एकर शेती आहे़ शेतीला जोड व्यवसाय म्हणून त्यांनी १२ म्हशी विकत घेवून दुग्धव्यवसाय सुरू केला़ घरच्या म्हशी असल्याने ३०० लिटर दूध दररोज विकायला नेण्याऐवजी त्यांनी स्वत:च दुधडेअरी सुरू करण्याला निर्णय घेतला. त्यासाठी सन २०११ मध्ये महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्पाअंतर्गत पाच लाख रुपये मंजूर झाले़ शासकीय नियमाप्रमाणे दुधडेअरीचे बांधकाम केले़ डेअरीमध्ये खवा, पनीर, तुप व सर्व स्निग्ध पदार्थ तयार करण्याच्या मशीन आणल्या़ या पाच लाखांच्या प्रकल्पात अडीच लाख बँकेचे कर्ज तर अडीच लाख अनुदान आहे़ यातील अडीच लाखांपैकी सव्वा लाखांचे अनुदान तत्कालीन तालुका कृषी अधिकारी बबन जुनघरे यांनी काढून दिले. यातील उर्वरीत सव्वा लाखांचे अनुदान काढण्यासाठी तालुका कृषी अधिकारी डॉ़ योगीराज जुमडे यांच्याकडे अर्ज सादर केला़ त्यांनी प्रकल्पाची पाहणी करून बटर चर्नर यंत्र कमी असल्याने अहवालात नमूद केले़ त्यानंतर शेतकरी राणे यांनी संबंधीत एजंसीकडून यंत्र आणले़ याची माहिती कृषी अधिकारी जुमडे यांना दिली़ सोबतच उपविभागीय कृषी अधिकारी अरुण बलसाणे यांनाही त्याची कल्पना दिली़ त्रुटीची पूर्तता केल्यावर अनुदान निघणे अपेक्षीत होते; परंतु संबंधीत तालुका कृषी अधिकार्यांनी यंत्राचे बील नव्याने देण्याचे फर्मान सोडले़ कोटेशन व अंतिम बील एकदाच मिळत असल्यामुळे शेतकरी राणे यांनी दुसरे बील आणल्यास मुल्यवर्धीत कर (व्हॅट) परत भरावा लागेल, असे सांगितले़ तरीसुद्धा शेतकर्यांची बाजू न ऐकता प्रकल्पच रद्द करण्याचे पत्र सदर अधिकार्यांनी पाठविले़ याप्रकरणी जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बºहाटे यांच्याकडे निवेदन सादर करून अनुदान काढण्याची मागणी केली़ अनुदान काढण्यासंबंधीचा प्रस्ताव उपविभागीय कृषी अधिकार्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना पाठविला़ याला महिन्याचा कालावधी लोटूनही अनुदान निघाले नाही़ याबाबत शेतकरी अण्णाजी राणे यांनी जिल्हा अधीक्षक बºहाटे यांना विचारणा केली असता तुमचे अनुदान का निघाले नाही़, हे तुम्हाला माहिती असे बोलून दिशाभूल केल्याचा आरोप राणे यांनी केला आहे़ या प्रकरणाची तक्रार निवेदनाद्वारे विभागीय कृषी सहसंचालक नागपूर कार्यालयाकडे केली आहे़(प्रतिनिधी)
दुधडेअरी प्रकल्पाच्या अनुदानाकरिता शेतकर्याची फरफट
By admin | Updated: May 17, 2014 23:49 IST