वर्धा : माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती मागितली असता ती चुकीची देण्याचा प्रकार आर्वी तालुक्यातील रोहणा येथील तलाठी आंबेकर याने केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकारणी सदर तलाठ्यावर कारवाई करण्याची मागणी सुनील दादाराव पाळेकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार सुनील आंबेकर यांचे डोंगरगाव येथे शेत आहे. यंदा अतवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील सोयाबीन खरडून निघाल्याने नुकसान झाले. तरीही अतवृष्टीग्रस्तांना मिळालेल्या मदतीपासून त्यांना वंचित ठेवण्यात आले.
यादीत नाव नसल्याने त्यांनी २८ मार्च २0१४ रोजी महिती अधिकारांतर्गत माहिती मिळावी यासाठी तहसीलदारांकडे यासंदर्भात अर्ज सादर केला. या अर्जाच्या आधारे रोहणा येथील तलाठी आंबेकर यांच्याकडून पत्र प्राप्त झाले.
पत्रात २६ मार्च २0१४ ला बँक ऑफ इंडियाच्या रोहणा शाखेत पाठविलेल्या यादीत धनादेश क्र. ४५४७५९ मध्ये मदत पाठविल्याचे नमूद होते. परंतु दीड महिन्याचा कालावधी उलटूनही अद्याप त्याच्या बँक खात्यात कुठलीही रक्कम जमा झालेली नाही.
त्यामुळे तलाठी आंबेकर यांनी खोटी माहिती दिल्याचा आरोप पाळेकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. तसेच त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून मदतीची रक्कम लवकरात लवकर खात्यात जमा करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
अतवृष्टीमुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले. तरीही त्यांना मदत मिळाली नाही. माहिती अधिकारांतर्गत दाद मागितली असता खोटी माहिती मिळत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
निवेदनाची प्रत आर्वी येथील उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आली आहे.(शहर प्रतिनिधी)