अमोल सोटे - आष्टी (शहीद)पंचायत समिती कृषी विस्तार अधिकाऱ्याने मागील वर्षी शेतकऱ्यांना अनुदानावर साहित्य वाटपाची यादी बदलवून भलत्याच लाभार्थ्यांना लाभ दिल्याचे माहिती अधिकारातून उघड झाली आहे़ हा प्रकार करणारा विस्तार अधिकारी गत महिनाभरापासून गैरहजर आहे़ याप्रकरणी शेतकऱ्यांनी जि़ल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना लेखी तक्रार केली असून त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे़कृषी विस्तार अधिकारी बी़ जी़ रडके यांनी सन २०१३-१४, २०१४-१५ या वर्षातील लाभार्थी यादी तयार करून जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाला पाठविली़ त्यानुसार स्प्रिंकलर पाईप, पीव्हीसी पाईप, ताडपत्री, फवारणी यंत्र, चार्जिंग पंप, आॅईल पंप, बैलबंडी आदी साहित्य वाटपासाठी अल्पभूधारक, दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांची यादी बनविली होती़ सदर यादीची प्रत पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेला जाते़ त्यानंतर मंजुरी प्राप्त होते़ मंजुरी मिळालेल्या लाभार्थ्यांना पोस्टाने पत्र पाठवून साहित्य घेवून जाण्याचे कळविल्या जाते़; मात्र विस्तार अधिकारी रडके अमरावती येथून ये-जा करीत असताना अनेकदा कार्यालयास येण्यासाठी विलंब झाला. खेड्यावरून आलेले शेतकरी दिवसभर त्यांची प्रतीक्षा करून निघून जायचे़ शेतकऱ्यांना साहित्य मिळाले नसल्याच्या अनेक तक्रारी वेळोवेळी करण्यात आल्या़ त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले़आॅक्टोबर महिन्यात केवळ दोन दिवस हजर राहून विस्तार अधिकारी मोकळे झाले़ याप्रकरणी गटविकास अधिकारी सी़ टी़ येवला यांनी दखल घेतली असून विस्तार अधिकारी रडके यांचा महिनाभराचे वेतन थांबविले आहे़ लाभार्थ्यांना साहित्य वाटपाचे सोडून पर्यायी व्यवस्था म्हणून दुसऱ्या लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आल्याचे समोर आले आहे. पंचायत समितीचे पदाधिकारी या प्रकाराला खतपाणी घालत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे़ गत अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांनी साहित्य वाटपाचा टेबल दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देण्याची मागणी करूनही दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे़सध्या पिकांवर फवारणीसाठी मोनोक्रोटोफॉस, मॅटॉलॉकसील, रोगर औषध आले आहे़ या औषधाचे वाटप करायला रडके गैरहजर आहेत. याप्रकरणी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता तो बंद होता़
शेतकरी लाभार्थी यादीच बदलविली
By admin | Updated: November 3, 2014 23:29 IST