वर्धा : कॅडर पक्ष म्हणून ओळख असलेल्या बसपच्या उमेदवाराला गत लोकसभेत मिळालेली मते टिकविण्यातही अपयश आले आहे. जिल्ह्यात दर वर्षीप्रमाणे यंदाही बसपचा उमेदवार तिसर्या क्रमांकावर राहिला. बसपच्या उमेदवाराला मिळणारी मते जिल्ह्यात नेहमी निर्णायक ठरतात; मात्र यंदाच्या निवडणुकीत वर्धेत बसपच्या उमेदवाराने घेतलेली मते कोणत्याही उमेदवारावर कुठलाही परिणाम टाकू शकली नाहीत. उलट त्यांची जमानतही जप्त झाली. २00९ मध्ये झालेल्या जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीत बसपचे उमेदवार विपीन कंगाले यांनी १ लाख ३१ हजार ५४२ मते घेतली होती. यंदा नवीन मतदारांची संख्या अडीच लाखांनी वाढली. यामुळे जुन्या मतांसह बसप या नव्या वाढीव मतांतील काही मते आपल्या खात्यात टाकेल व जिल्ह्यात बसपची मतदार संख्या वाएवेल असे भाकीत करण्यात आले होते. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्याचे उलटेच झाले. उभे असलेले बसपचे उमेदवार चेतन पेंदाम यांना मतांचा आकडा वाढविणे सोडा बसपच्या नावावर २00९ मध्ये असलेला आकडा कायम ठेवणेही शक्य झाले नाही. चेतन पेंदाम हे या निवडणुकीत पक्षाची तिसर्या क्रमांकाची जागा राखू श कले मात्र त्यांना ९0 हजार ८६६ मतांवर समाधान मानावे लागले. पक्षाच्या पक्क्या मतदारांनीही उमेदवाराला नाकरल्याचे यावरून समोर येत आहे. एक मोठा व नियमाने चालणारा पक्ष म्हणून राज्यात ओळख असलेल्या या पक्षाच्या उमेदवाराला निवडूण येण्याचा योग जिल्ह्यात अद्याप आला नाही. मात्र या पक्षाची एक ओळख कायम ठेवणेही या निवडणुकीत शक्य झाले नाही. बहुजन समाज पक्षाचा उमेदवार जेवढी जास्त मते घेईल त्याचा लाभ काँग्रसला होईल असे आतापर्यंतचे गणित होते. यंदाच्या निवडणुकीत हे गणित पुरते गडबडले आहे. बसपच्या उमेदवाराला लाखापर्यंतही पोहोचणे शक्य झाले नाही. बसपा उमेदवाराला मिळालेली अत्यल्प मते व काँग्रेसच्या उमेदवाराच्या मतात झालेली घट भाजपच्या पथ्यावर पडली.(प्रतिनिधी)
बसपाला मताधिक्य टिकविण्यात अपयश
By admin | Updated: May 17, 2014 00:24 IST