अमोल सोटे - आष्टी (श़)शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा सामना करता यावा आणि अपूरा पाऊस, पावसातील खंड, अति पाऊस या तीन हवामान घटकाच्या धोक्यापासून शेती पिकांना संरक्षण मिळावे म्हणून राज्य शासनाने हवामानावर आधारित पीक विमा योजना सुरू केली; पण वर्धा जिल्ह्यात कृषी विभाग व बँकांतील अंतर्गत मतभेदामुळे योजनेचा पूरता बट्ट्याबोळ झाला आहे. या योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी वरिष्ठांकडे केली आहे.राष्ट्रीय पीक विमा योजनेचा खरिपाच्या सोयाबीन, कपाशी, मुग, उडीद पिकासाठी लाभ दिला जातो. दरवर्षी पेरणी झाल्याबरोबर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून अर्ज घेऊन भरावा लागतो. भरलेला अर्ज संबंधित मौजांतर्गत येणाऱ्या बँकेत जमा करावा लागतो. यासाठी कृषी अधीक्षक वर्धा यांना शासनाकडून शेतीशाळा घेण्याचे आदेश आले होते; पण जिल्ह्यातील आठही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एकही शेतीशाळा अद्याप घेण्यात आली नाही. यामुळे शेतकरी अर्जांपासून अनभिज्ञच राहिले़ सदर योजनेचा अंतिम कालावधी ३० जून आहे; पण अद्याप पावसाअभावी पेरणीच व्हायची आहे. यामुळे अर्ज भरून देण्यास अडचण जात आहे. कृषी विभाग शेतकऱ्यांना पेरणीपूर्व कुठलीच मदत करीत नाही. पेरणीअभावी शासन पेरणीपूर्व पीक विमा योजनेचे अर्ज घेणार काय, त्यानंतर पिकात बदल झाल्यास काय करावे आदी माहिती शेतकऱ्यांकडे नाही. जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाचा खंड पडल्याने खरिपाच्या कपाशी, सोयाबीन, मुग व उडीद पिकाची लागवड झाली नाही. यासाठी कृषी विभागाने २० जुलैपर्यंत योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी कृषीमंत्र्यांकडे केली आहे. तुर्तास शासन व बँका यांनी काय धोरण ठरविले, याची माहिती मिळू शकली नाही.
पावसाअभावी विमा योजनेचा फज्जा
By admin | Updated: July 1, 2014 01:39 IST