नाविण्यपूर्ण उपक्रम : प्रजासत्ताकदिनी विक्रीप्रदर्शन ठरले आकर्षण वर्धा : मगन संग्रहालय समितीमार्फत विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. यात टकळीवर सूतकताई हा विशेष उपक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आला आहे. त्यातीलच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या १७ मिटर कापडाच्या वस्तुंचे यंदा प्रजासत्ताकदिनी विक्रीप्रदर्शन क्रीडा संकुलात भरविण्यात आले. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांसह अनेकांनी या प्रदर्शनाला भेट देत उपक्रमाचे कौतुक केले.२०१५-१६ या चालू वर्षात शहरातील सुशिल हिंमतसिंगका कन्या शाळा, आनंद येथे विद्यालय बोरगाव मेघे, विकास विद्यालय, जगजीवनराम विद्यालय या शाळांमधील ७० विद्यार्थी व त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील नेहरू विद्यामंदिर सालोड, यशवंत विद्यालय येळाकेळी, आदर्श विद्यालय आंजी, विवेक माध्यमिक विद्यालय, मांडवा आदी ग्रामीण भागातील ९६ विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी टकळीवर सूत लावून त्यापासून कापडनिर्मिती केली. या कापडापासून रुमाल व इतरही वस्तू तयार करून त्याची विक्री व प्रदर्शन वर्धा येथील क्रीडा संकुलात प्रजासत्ताकदिनी भरविण्यात आले. यावेळी टकळीवर सूत कताईचे प्रात्यक्षिक विद्यार्थी उपस्थितांना करून दाखवित होते. जिल्हाधिकारी आशुतोष सलील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल यासह जिल्ह्यातील मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट देत विद्याथ्यांचे कौतुक करीत माहिती जाणून घेतली. (शहर प्रतिनिधी)
टकळीवर सूतकताईतून १७ मीटर कापडाची निर्मिती
By admin | Updated: January 30, 2016 02:30 IST