कारवाई : जेसीबीसह खोदकामाचे साहित्य जप्तहिंगणघाट : उत्तम गॅल्वा स्टील कंपनीने भुगावच्या कारखान्यासाठी वणा नदीतून पाणी घेण्याची परवानगी घेतली नाही. महसूल विभाग व वनविभागाचीही परवानगी घेतली नाही आणि नदी पात्रात व काठावर विहिरींचे खोदकाम करण्याचा सपाटा लावला. हा नियमबाह्य प्रकार लक्षात येताच तहसीलदार व वन विभाग यांनी संबंधित कंपनीच्या जेसीबीसह अन्य खोदकामाचे साहित्य जप्त केले. वणा नदीमध्ये कुठलाही बंधारा नसून थोड्या फार प्रमाणात वाहते पाणी असते. या वाहत्या पाण्यावर हिंगणघाटपासून पूढे अनेक गावांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. नळ योजनेच्या विहिरी याच नदीवर असून ग्रामीण जनतेला पिण्याकरिता पुरवठा होतो. शेतकऱ्यांनाही ओलितासाठी पाणी दिले जाते. उन्हाळ्यात जनावरांना वणा नदी आश्रयस्थान ठरते. असे असताना एक मीटर व्यासाच्या पाईपलाईनमधून सदर कंपनीने पाणी पळविले तर वणा नदी कवडघाट हायवे पुलाच्या पलीकडे कोरडी पडणार आहे. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी व्याकूळ व्हावे लागणार आहे. या गावांतील निस्तार पत्रकाप्रमाणे नदीवरील पाण्यावर येथील ग्रामस्थांचाही कायदेशीर हक्क आहे. वास्तविक, भूगाव येथील स्टील प्लांटसाठी धाम नदीवर पवनार येथे बंधारा बांधून त्यातील पाणी आरक्षित केले आहे. वर्धा शहर, एमआयडीसी व कारखान्यांसाठी त्या बंधाऱ्यातील पाणी आरक्षित असताना वणा नदीचे पाणी पळविणे हा कंपनीचा प्रकार बेकायदेशीर आहे. बांधकाम विभाग वर्धा यांनी सदर कंपनीला केवळ पाईपलाईन टाकण्याची परवानगी दिली आहे. यातील मूळ टिपणीमध्ये ही परवानगी तात्पुरती व एक वर्षासाठी आहे; पण आदेश पत्राचे पहिले पान बदलून त्यात बदल केल्याची शकयता आहे. याबाबत कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग वर्धा यांनी सदर कंपनीची १९ मे रोजी दिलेली परवानगी नियमाबाह्य प्रकारामुळे रद्द करावी, टंचाई लक्षात घेता कंपनीला पाणी घेण्यास सक्त हरकत घ्यावी, विहिरींचे खोदकाम बंद करावे, अशी मागणी नगर विकास सुधार समितीचे प्रा. दिवाकर गमे, मनोज रूपारेल, नरेंद्र चुंबले, राजू अरगुडे, प्रमोद जुमडे आदींनी केली आहे.(शहर प्रतिनिधी)
वणा नदीच्या पात्रात विनापरवानगी विहिरीचे खोदकाम
By admin | Updated: May 22, 2015 02:22 IST