सेलू : शेताच्या बांधापर्यंत पक्का रस्ता नसला तरी सुस्थितीतील कच्चा रस्ता असावा, अशी माफक मागणी शेतकऱ्यांची असते. मात्र पावसाळा आला तरीही पांदण रस्त्यांच्या दुरुस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा प्रत्यय येत असून यंदाही त्यांना चिखलातूनच वाट काढत शेताकडे मार्गक्रमण करावे लागेल असे दिसून येते. पावसाळा सुरू झाला तरी पांदण रस्ते अद्याप उपेक्षीत आहे. एकीकडे शासन विकासाच्या योजना राबवित असताना शेतकरी मात्र यापासून वंचीत असल्याचे दिसते. आपला देश कृषीप्रधान देश असताना शेताच्या बांधापर्यंत पक्का रस्ता नसल्याचे वास्तव आहे. शेतकऱ्यांना पावसाळ्याच्या दिवसात चिखलातून वाट काढीत, खांद्यावर नांगर घेवून शेतात पोहचण्याचा त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांची किमान डागडुजी करण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात. मात्र ती देखील पूर्ण होत नसल्याने निराश होण्याची वेळ येते. शेतातील भाजीपाला व शेतमाल नेण्यासाठी चांगला रस्ताच नसल्याने शेतकऱ्याची आर्थिक संपन्नता कशी होणार हा प्रश्न उपस्थित आहे. नरेगा योजने अंतर्गत पांदण रस्त्याची कामे करण्याचे निकष आहे.पण पांदण रस्त्यावरील असणारे अतिक्रमण, वाढलेली झाडे झुडपे पाहता मजुरांना काम करताना अडचणीचा सामना करावा लागतो. या कामासाठी मिळणारी मजूरी अल्प असल्याचे मजूर सांगतात. सेलू परिसरात काही पांदण रस्ते १० वर्षांपूर्वी डांबरीकरण झाले. मात्र उर्वरीत रस्त्यांची अवस्था पावसाळ्यात चिखलानी बजबज असते. शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देत पांदण रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)
पावसाळा आला तरी पांदण रस्ते उपेक्षितच
By admin | Updated: July 9, 2015 02:19 IST