अरुण फाळके ल्ल कारंजा (घा.)तालुक्यातील उमरी गावालगत ३५ वर्षांपूर्वी बांधलेल्या पाझर तलावाच्या मुख्य भिंतीला निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे भेगा पडल्या आहे. भिंतीचा बराच भाग घसरून तलावाला धोका निर्माण झाला आहे. चार वर्षांपूर्वी याच तलावाच्या भिंतीला भेगा पडून भिंत सरकली होती. दुरूस्ती केली; पण दुरूस्तीचे कामही शास्त्रशुद्ध झाले नसल्याने येरे माझ्या मागल्या हीच परिस्थिती निर्माण झाली. आणखी पाऊस आल्यास कमकुवत भिंत खचून उमरीची जनता आणि लगतच्या शेतातील पिकांचे नुकसान होणे निश्चित आहे.१९८१ मध्ये लघुसिंचन जि.प. विभागातर्फे रोजगार हमी योजनेंतर्गत हा उमरी पाझर तलाव १२ ते १५ लाख रुपये खर्च करून बांधला होता; पण तेव्हाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होते. तलावाची ५०० मीटर लांबीची मुख्य भिंत बांधताना प्रेसींग बरोबर झाले नाही. पिचींगही मजबूत करण्यात आले नाही. परिणामी, पाच वर्षांपूर्वी भिंतीचा काही भाग तलावातील पाण्याच्या दाबामुळे खचला, सरकला आणि भिंतीला भेगा गेल्य. त्यावेळी गावकऱ्यांनी ओरड करीत निकृष्ट दर्जाच्या कामाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यावेळी दुरूस्तीसाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून तांत्रिक भान न ठेवता जुजबी स्वरूपाची दुरूस्ती करण्यात आली. या दुरूस्तीचे काम दर्जेदार झाले नसल्याने धोका कायमच राहिला. माजी सरपंच सुरेश भक्ते आणि ग्रामस्थांनी पुन्हा शासनाकडे तलावाच्या निकृष्ट काजाबाबत तक्रार केली असता पुनर्दुरूस्तीसाठी ५८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. २२ आॅगस्ट २०१४ ला दुरूस्तीच्या कामाला गाजावाजा करून सुरूवात झाली. ३८ लाखांचा निधी खर्चही झाला; पण जुलै महिन्यातील पावसामुळे पुन्हा धरणाच्या भिंतीला भेगा पडल्या. भिंत घसरली. शेजारच्या गावाला व शेतीला धोका निर्माण झाला. पुनर्दुरूस्तीचे कामही शास्त्रशुद्ध झाले नाही. ७८ लाखांचा खर्च व्यर्थ ठरला. बुधवारी अधिकाऱ्यांनी भेटी देत भेगा बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे. धोका टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
डागडुजीनंतरही उमरी पाझर तलावाच्या भिंतीला गेले तडे
By admin | Updated: August 28, 2015 02:19 IST