वर्धा : शहर पोलीस ठाण्याच्या वतीने जानेवारी ते १६ सप्टेंबर २०१५ या नऊ महिन्याच्या काळात इतवारा, पुलफैल व आनंदनगर या भागात तब्बल ४७ वेळा मोहीम राबविली. या मोहिमेत त्यांच्याकडून ८२ लाख ६० हजार १३५ रुपयांचा मोहा सडवा जप्त करून दारूभट्ट्या नष्ट करण्यात आल्या. यावरही पोलिसांनी गुरुवारी सकाळी या भागात पुन्हा मोहीम राबविली. यात ३ लाख ४६ हजार ९०० रुपयांचा मोहा सडवा जप्त करून भट्ट्या नष्ट करण्यात आल्या. पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या मोहिमेनंतरही या भागात पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण होत आहे. यामुळे या दारूविक्रेत्यांना काही पोलीस अधिकाऱ्यांचेच पाठबळ तर नाही ना, असा प्रश्न समोर येत आहे.प्रत्येक कारवाईत मोठ्या प्रमाणात दारू गाळणारे साहित्य जप्त करण्यात येते. असे असतानाही या दारूविक्रेत्यांकडे तेवढेच साहित्य पुन्हा तयार होते. या मागचे नेमके कोडे न उमगणारेच आहे. पोलिसांच्या कारवाईदरम्यान भट्टी चालविणाऱ्यांवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येतो. हा व्यवसाय करणाऱ्या एकूण १०५ जणांवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. असे असतानाही दारू गाळण्याचे काम सुरूच असल्याने कोणती उपाययोजना करावी हेच सूचत नसल्याचे शहर पोलिसांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी) या वॉश आऊट मोहिमेदरम्यान एका महिला पोलीस उपनिरीक्षकाला दारू विक्रेत्या महिलेच्या संतापाचा चांगलाच फटकाही बसला. या महिला अधिकाऱ्याला मारहाणही करण्यात आली होती. यानंतर पोलिसांकडून ही मोहीम अधिक तीव करण्यात आली; मात्र याचा काहीही उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे.पाच महिन्यात ७५ लाखांचा मुद्देमाल नष्ट वर्धा पोलिसांच्या वतीने मे २०१५ मध्ये वॉश आऊट मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांच्या वतीने एकूण ७४ लाख ९७ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केल्याची नोंद शहर पोलिसांत आहे. ही वॉश आऊट मोहीम यानंतरही अशीच सुरू राहणार असल्याचे शहर पोलिसांच्या वतीने सांंगण्यात येत आहे.
दारूभट्ट्या नष्ट करूनही परिस्थिती ‘जैसे थे’
By admin | Updated: September 26, 2015 02:17 IST