महसूल व स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष : गावठाण कुठे हाच प्रश्नसेलू : गावाला गावठाण असून त्यावर महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हे गावाठाण अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. काही वस्ती तर कुठे शेतकऱ्यांनी ताब्यात घेतले असल्याचे चित्र आहे. यामुळे शासकीय गावठाण अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे.सहा हजार लोकसंख्या असलेल्या घोराड गावात सात एकराहून अधिक आराजी असलेले गावठाण दिसेनासे झाले आहे. गावापासून मौजा घोराड मध्ये ७०० ते ८०० मीटर अंतरावर हे शासकीय गावठाण आहे. कित्येक वर्षापासून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी ताब्यात घेऊन त्यावर शेती करणे सुरू केले. एवढेच नाही तर आपल्या शेताची आराजी वाढविण्यात धन्यता मानणाऱ्यांनाही हे शासकीय गावाठाण असल्याची भुरळ पडली. शासनाच्या महसूल विभागानेसुद्धा नकाशा वगळता गावठाण कुठे आहे. याचा शोध घेण्याचा काही प्रयत्न केला नाही. शासनाने गत काही वर्षांपासून संपुर्ण ग्रामजयंती योजनेंतर्गत पांदण रस्ते निर्माण करून शासकीय जागेवरील अतिक्रमण दूर करण्यासाठी पुढाकार घेतला. पण ही योजना घोराड येथे कागदावरच राहिल्याचे चित्र पहायला मिळत आहे.गत दोन वर्षाअगोदर तलाठी कार्यालयात या गावातील काही तरूणांनी पुढाकार घेवून या गावठाणवरील अतिक्रमण दूर करावे असे निवेदन दिले होते. पण या निवेदनाला सुद्धा वाटण्याच्या अक्षताच पहाव्या लागल्या. पण आता शासनाने गावातील केर कचरा एकाच ठिकाणी जमा करण्यासाठी गावात असणाऱ्या शासकीय जागेवर कचरा डेपोची निर्मिती करण्यास पुढाकार घेतला आहे. तसे ठरावसुद्धा स्वातंत्र्यदिनी झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे. त्यामुळे घोराड येथील शासकीय गावठाणाची भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून गावठाणातील असलेले अतिक्रमण कधी काढल्या जाणार याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)
शासकीय गावठाणाला अतिक्रमणाचा विळखा
By admin | Updated: August 29, 2015 02:19 IST